अकोला जिल्ह्यातील २७१ सरपंचपदे महिलांसाठी आरक्षित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 10:15 AM2021-02-04T10:15:02+5:302021-02-04T10:15:08+5:30
Sarpanch posts Reservation एकूण ५३२ सरपंचपदांपैकी २७१ सरपंचपदे महिलांसाठी आरक्षित करण्यात आली.
अकोला : जिल्ह्यातील महिला सरपंचपदांची आरक्षण सोडत बुधवार, ३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जाहीर करण्यात आली. अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाच्या महिला सरपंचपदांचे यापूर्वी जाहीर केलेले आरक्षण कायम ठेवून, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (नामाप्र) आणि सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिला सरपंचपदांची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानुसार, जिल्ह्यातील एकूण ५३२ सरपंचपदांपैकी २७१ सरपंचपदे महिलांसाठी आरक्षित करण्यात आली. त्यामध्ये एससी ६३, एसटी २३, नामाप्र ७४ आणि सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी १११ सरपंचपदे आरक्षित करण्यात आली.
जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सातही तालुक्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले. त्यापूर्वी २०२० ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आले होते. परंतु, जाहीर केलेले सरपंचपदांचे आरक्षण रद्द करून, ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालानंतर ३० दिवसांच्या कालावधीत सरपंचपदांच्या आरक्षणाची सोडत नव्याने राबविण्याचा आदेश शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिला होता. त्यानुसार, ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे अनूसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण इत्यादी प्रवर्गनिहाय आरक्षण जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमध्ये १ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील महिला सरपंचपदांचे आरक्षण ३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जाहीर करण्यात आले. त्यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या महिला सरपंचपदांचे यापूर्वी जाहीर करण्यात आलेले आरक्षण कायम ठेवून, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिला सरपंचपदांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व जिल्ह्यातील सातही तहसीलदारांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील महिला सरपंचपदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानुसार, जिल्ह्यातील एकूण ५३२ सरपंचपदांपैकी २७१ सरपंचपदे महिलांसाठी आरक्षित करण्यात आली. त्यामध्ये अनुसूचित जाती ६३, अनुसूचित जमाती २३, नागिरकांचा मागासवर्ग प्रवर्ग ७४ व सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी १११ सरपंचपदे आरक्षित करण्यात आली.
महिला सरपंचपदांचे तालुका व प्रवर्गनिहाय असे आहे आरक्षण!
तालुका एससी एसटी नामाप्र सर्वसाधारण
तेल्हारा ०७ ०३ ०९ १३
अकोट ०८ ०६ १२ १७
मूर्तिजापूर ११ ०२ १२ १९
अकोला १४ ०४ १३ १८
बाळापूर ११ ०१ ०९ १३
बार्शिटाकळी ०६ ०३ ११ २०
पातूर ०६ ०४ ०८ ११
.....................................................................................................
एकूण ६३ २३ ७४ १११