शहरातील २८ विहिरी गायब; विहिरी बुजवून उभारली घरे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:41 AM2021-09-02T04:41:55+5:302021-09-02T04:41:55+5:30
आज शहरवासीयांना महान येथील धरणातून पाणीपुरवठा केला जाताे. सुमारे २५ वर्षांपूर्वी शहराच्या विविध भागातील नागरिकांकडे विहिरी उपलब्ध हाेत्या. मनपाची ...
आज शहरवासीयांना महान येथील धरणातून पाणीपुरवठा केला जाताे. सुमारे २५ वर्षांपूर्वी शहराच्या विविध भागातील नागरिकांकडे विहिरी उपलब्ध हाेत्या. मनपाची २०१६ मध्ये हद्दवाढ झाल्यानंतर शहरालगतच्या १३ ग्रामपंचायतींसह २४ गावांचा मनपात समावेश झाला. यावेळी संबंधित भागात स्थानिक रहिवाशांकडे विहिरी उपलब्ध असल्याची मनपाकडे नाेंद आहे. दरम्यान, काही वर्षांपासून शहरातील सुमारे २८ पेक्षा अधिक विहिरी गायब झाल्याची माहिती आहे. काही विहिरींना पाणी नसल्यामुळे तसेच काही विहिरींचा घर बांधकाम करताना अडथळा ठरत असल्याने त्या बुजविण्यात आल्या आहेत. विहिरींमधून पाणी उपसा करताना अनेक समस्या निर्माण हाेत असल्यानेही रहिवाशांनी सबमर्सिबल पंपांचा पर्याय निवडला आहे.
हे घ्या पुरावे!
१) कधीकाळी सातव चाैक, बिर्ला काॅलनी, जठारपेठ आदी भागातील रहिवाशांची तहान भागविण्यासाठी दादासाहेब दिवेकर चाैकात भलीमाेठी विहीर हाेती. कालांतराने घराेघरी नळ कनेक्शन तसेच हातपंप, सबमर्सिबल पंपांची संख्या वाढल्याने नागरिकांनी या विहिरीकडे पाठ फिरवली. त्यामुळे या विहिरीवर साैंदर्यीकरण करून ती तात्पुरती बुजविण्यात आली.
२) जुने शहरातील डाबकी राेड भागात एका नामवंत शैक्षणिक संस्थेच्या आवारात माेठी विहीर हाेती. पाण्याचा स्त्राेत आटल्याने ही विहीर विद्यार्थ्यांसाठी धाेकादायक ठरू लागली हाेती. संस्थेने ती बुजवत त्यावर साैंदर्यीकरण केले आहे.
३) डाबकी राेड भागातील प्रभाग क्रमांक ८ मधील लक्ष्मीनगरमध्ये नागरिकांच्या सार्वजनिक वापरासाठी विहीर बांधण्यात आली हाेती. अतिशय काेरीव दगडी बांधकामातील ही विहीर अनेकांचे लक्ष वेधून घेत हाेती. पाण्याचा स्त्राेत आटल्याने ती १९९३ मध्ये बुजविण्यात येऊन त्यावर घर बांधण्यात आले.
सहकारनगरमधील विहीर धाेकादायक
गाेरक्षण राेड भागातील सहकारनगरमध्ये मुख्य रस्त्यालगतच भलीमाेठी विहीर आहे. २५ वर्षांपूर्वी यातून पाण्याचा उपसा केला जात हाेता. आज ही विहीर स्थानिक रहिवाशांसाठी धाेकादायक बनली आहे. विहिरीच्या आजूबाजूला कठडे नसल्याने या ठिकाणी माेठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मनपासह पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
शहरात २००४ मध्ये दुष्काळग्रस्त स्थिती हाेती. तेव्हा संकटसमयी नागरिकांनी विहिरीतूनच पाण्याचा उपसा करून तहान भागवली हाेती. अशा विहिरींना जीवंत ठेवण्याची गरज असताना त्या बुजविण्यात आल्या. याला मनपा प्रशासनासह पदाधिकाऱ्यांचे धाेरण कारणीभूत आहे.
- शंतनू मानतकर, पर्यावरणप्रेमी
भूजल पातळी माेठ्या प्रमाणात घसरल्यामुळे विहिरीतील पाण्याचे स्त्राेत आटले. अशा विहिरींचा वापर कचरा टाकण्यासाठी करण्यात आला. काहींनी त्यावर घरे बांधली. अस्तित्वात असलेल्या विहिरींचे जतन करणे गरजेचे आहे.
- शुभम काेगदे, पर्यावरणप्रेमी
शहरात २५ ते ३० वर्षांपूर्वी विहिरींची माेठी संख्या हाेती. पाण्याचे स्त्राेत कमी झाल्याने नागरिकांनी हातपंप, सबमर्सिबल पंपचा पर्याय निवडला. पूर्व झाेनमधील धाेकादायक ठरणाऱ्या विहिरींभोवती कठडे उभारले जातील.
- विजय पारतवार, क्षेत्रीय अधिकारी, पूर्व झाेन