४१ हजारावर फुकट्या प्रवाशांकडून ३ कोटी ७३ लाखांचा दंड वसूल
By Atul.jaiswal | Published: November 18, 2023 12:30 PM2023-11-18T12:30:33+5:302023-11-18T12:30:59+5:30
एकाच दिवशी ६५ लाखांचा दंड वसूल
अकोला : सणासुदीच्या काळात सर्वच मार्गांवरील रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढली असतानाच या गर्दीचा फायदा घेत विनातिकिट प्रवास करणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. अशा फुकट्या प्रवाशांना चाप लावण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात ९ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या तिकिट तपासणी मोहिमेत ४१ हजार ८९४ विनातिकिट प्रवाशांकडून ३ कोटी ७३ लाखांचा दंड वसुल करण्यात आला.
भूसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धीरेंद्र सिंग आणि सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट चेकिंग) रत्नाकर क्षीरसागर यांच्या नेतृत्वात संपूर्ण भूसावळी विभागात ही मोहिम राबविण्यात आली. यामध्ये तब्बल ५३७ कर्मचारी सहभागी झाले होते. मोहिमे दरम्यान विनातिकीट/अनधिकृत प्रवासाच्या एकूण ४१,८९४ प्रकरणांतून एकूण ३ कोटी ७३ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.
सर्व अधिकृत रेल्वे प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा सुनिश्चित करण्यासाठी, भुसावळ विभागात विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मेल एक्स्प्रेस, सुविधा ट्रेन्स , विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणीचे कार्य करण्यात येते. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी, भुसावळ विभाग प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊनच प्रवास करावा असे आवाहन करीत आहे.
एकाच दिवशी ६५ लाखांचा दंड वसूल
या मोहिमेत शनिवार, ११ नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात विनातिकिट आढळलेल्या ७,३७० प्रवाश्यांकडून एकूण ६८ कोटी ८५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. भुसावळ मंडळाच्या आजवरच्या इतिहासातील दंड वसुलीचा हा नवा विक्रम ठरला.