३ कोटी रुपयांची थकबाकी : अकोल्याचा पाणीपुरवठा बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:07 PM2020-02-11T12:07:54+5:302020-02-11T12:08:02+5:30
महापालिकेने थकीत रक्कम न भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहराला काटेपूर्णा प्रकल्पातून (महान धरण) केला जाणारा पाणीपुरवठा पाटबंधारे विभागाने सोमवारी दुपारी १२ वाजतापासून बंद केला. महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे थकीत ३ कोटी ५५ लक्ष रुपये तातडीने जमा न केल्यास संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याची नोटीस ३ फेब्रुवारी रोजी पाटबंधारे विभागाने मनपाला जारी केली होती. त्यानंतरही महापालिकेने थकीत रक्कम न भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी संध्याकाळी महापालिकेने ४७ लाख ७४ हजार १७ रुपयांचा धनादेश पाटबंधारे विभागाकडे पाठविला आहे.
काटेपूर्णा प्रकल्पात अकोला शहरवासीयांसाठी २४ दलघमी पाणी आरक्षित आहे. पाणीपुरवठ्याच्या बदल्यात मनपा प्रशासनाला पाटबंधारे विभागाकडे शुल्क जमा करणे भाग आहे. मनपाक डून सदर शुल्क जमा होत नसल्याचे पाहून २ फेब्रुवारी रोजी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मनपाला नोटीस जारी केली. यामध्ये ३ कोटी ५५ लक्ष ८५ हजार रुपयांची थकबाकी सात दिवसांत जमा करण्याची सूचना केली होती. थकीत रक्कम जमा न केल्यास शहराचा पाणीपुरवठा बंद करणार असल्याचे या विभागाने नमूद केले होते तसेच पाणीपुरवठा बंद झाल्यास शहरात उद्भवणाऱ्या परिस्थितीला महापालिका जबाबदार राहील, असा सूचक इशारा देण्यात आला आहे. महापालिकेने या नोटीसला गांभीर्याने घेतले नाही व मुदत संपण्याची वाट पाहिली. त्यामुळे सोमवारी १० फेब्रुवारी रोजी महापालिकेचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडे थकीत असलेल्या ३ कोटी ५५ लक्ष ८५ हजार रुपयांची थकबाकी निरंक होईपर्यंत पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार नाही, अशी ताकीद महापलिकेला पाटबंधारे विभागाने दिली आहे.
महापलिकेने सोमवारी संध्याकाळी ४७ लाखांचा धनादेश पाटबंधारे विभागाकडे दिला आहे. उर्वरित रक्कमही टप्याटप्याने भरल्या जाईल.
- संजय कापडनिस, आयुक्त, महापलिका