६ हजारावर शिक्षकांच्या आयकार्डसाठी तीन लाखांचा निधी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 03:22 PM2019-10-30T15:22:39+5:302019-10-30T15:22:48+5:30
शासनाच्या समग्र शिक्षा अंतर्गत ३ लाख ७४५ रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
अकोला: जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना शासनाने ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शासनाच्या समग्र शिक्षा अंतर्गत ३ लाख ७४५ रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
समग्र शिक्षा अंतर्गत शासनाने शाळांची गुणवत्ता आणि शैक्षणिक कार्यक्षमता वाढविण्यासोबतच शाळांमधील शिक्षकांना ओळख मिळावी या दृष्टिकोनातून ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना पत्र पाठवून जिल्ह्यातील ६ हजार ४२५ शिक्षकांना ओळखपत्र उपलब्ध करून देण्यास म्हटले आहे. प्रत्येक शिक्षकाच्या ओळखपत्रासाठी प्रत्येकी ५0 रुपये याप्रमाणे ३ लाख ७४५ रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला. ओळखपत्र तयार करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला पुरवठादाराकडे काम सोपविण्यात यावे. ओळखपत्रावरील माहिती चुकीची आढळून आल्यास, त्या शिक्षकांना दुसरे ओळखपत्र छपाई करून द्यावे. त्यासाठी पुरवठादारास कोणताही अतिरिक्त निधी देऊ नये. ओळखपत्र छपाई व वितरणाचे कामकाज २0१९-२0 या आर्थिक वर्षातच पूर्ण करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.