अकोला जिल्ह्यातील ३० टक्के जनावरांना घटसर्प आणि फऱ्या प्रतिबंधक लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 07:13 PM2021-06-20T19:13:27+5:302021-06-20T19:13:38+5:30
30% animals vaccinated in Akola district : पावसाळ्याआधी जनावरांना घटसर्प आणि फऱ्या प्रतिबंधक लस देणे आवश्यक आहे.
अकोला : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. दुसरीकडे पशुसंवर्धन विभाग पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेत आहे. पावसाळ्याआधी जनावरांना घटसर्प आणि फऱ्या प्रतिबंधक लस देणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यात लसीकरण मोहिम सुरू असून आतापर्यंत ३० टक्के जनावरांचे लसीकरण आटोपले आहे.पावसाळ्याच्या दिवसांत जनावरांना साथरोग होऊ नये, यासाठी नियमित लसीकरण करण्यात येते. पावसाळ्यात जनावरांना फऱ्या आणि घटसर्प आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी लसीकरण करण्याचे पशुसंवर्धन विभागाचे नियोजन केले होते. यानुसार पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहिमेला सुरुवात केली. जिल्ह्यात लस पुरवठा करण्यात आला आहे. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने तालुका स्तरावर लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३०-३५ टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
दिलेल्या सूचनांचे पालन करून जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नदीकाठच्या भागात जनावरे रोगग्रस्त होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या ठिकाणच्या जनावरांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे.
- डॉ.तुषार बावणे, उपायुक्त जिल्हा पशुसंवर्धन