मूर्तिजापुरातील गोदामातून ३० लाखांचा अवैध धान्य साठा जप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 10:14 AM2020-09-30T10:14:06+5:302020-09-30T10:14:15+5:30
गोडाऊनवर छापा घालून तब्बल ४0 लाख रुपयांचा धान्यसाठा जप्त केला.
मूर्तिजापूर : येथील जे. के. जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीच्या गोडाऊनमध्ये अवैधरित्या रेशनचा धान्यसाठा साठवून ठेवल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी २८ सप्टेंबर रोजी रात्री १0 वाजताच्या सुमारास गोडाऊनवर छापा घालून तब्बल ४0 लाख रुपयांचा धान्यसाठा जप्त केला. जप्त केलेल्या धान्यात शालेय पोषण आहाराचाही साठा आहे.
शहर पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांना मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गावरील जे.के. जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीच्या गोडाऊनवर छापा घातला असता, गोडावूनमध्ये महाराष्ट्र शासन व भारत सरकार असे अंकित केलेले ५०२ क्विंटल गहू, ३८४ क्विंटल तांदूळ, ७३.५ क्विंटल मका, १२,५ क्विंटल चणा व इतर धान्य साठा, अडीच हजार रिकामी पोती व ३ चारचाकी मालवाहू वाहन असा एकूण ४० लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. यात शालेय पोषण आहारातील अन्नधान्य व हळद, मूग, जिरे, डाळ याचाही समावेश असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पवार यांनी दिली. सदर माल जप्त करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई तहसीलदार मूर्तिजापूर करीत आहेत. सदर धान्य साठ्याची काळ्या
बाजारात विक्रीसाठी साठवणूक करण्यात आली असल्याने, जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत अशा कारवायांसाठी तक्रार दाखल करणे महसूल विभागाचे कार्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. यासंदर्भात अद्यापही कोणावरही कारवाई करण्यात आली नसून, याबाबत पुरवठा विभाग काय भूमिका घेते, यावर पुढील कारवाई अवलंबून आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक आशीष शिंदे, पोलीस कर्मचारी सलमान शेख, पंकज पांडे, हरिशंकर शुक्ला, श्याम मोहाळे यांनी केली.
आढळून आलेल्या धान्य साठ्यात शालेय पोषण आहाराचा समावेश आहे. यासंदर्भात कागदपत्रे पडताळणीस सादर करण्यासाठी काही लोकांना सुचविण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत पुरावे पुरवठा विभागाकडे सादर न झाल्यास पोलीस गुन्हा दाखल करतील.
- प्रदीप पवार
तहसीलदार, मूर्तिजापूर