डिसेंबरचे ३१ पैकी ३० दिवस प्रदूषित; १०१ पेक्षा अधिक एक्यूआयचे २१ दिवस

By Atul.jaiswal | Published: January 1, 2024 05:59 PM2024-01-01T17:59:24+5:302024-01-01T17:59:57+5:30

चांगल्या एक्यूआयचा केवळ एक दिवस

30 out of 31 days of December polluted; 21 days of AQI greater than 101 | डिसेंबरचे ३१ पैकी ३० दिवस प्रदूषित; १०१ पेक्षा अधिक एक्यूआयचे २१ दिवस

डिसेंबरचे ३१ पैकी ३० दिवस प्रदूषित; १०१ पेक्षा अधिक एक्यूआयचे २१ दिवस

अतुल जयस्वाल, अकोला : वाहनांची वाढती संख्या, वाढते बांधकाम, रस्त्यावर उडणारी धूळ यासह इतर कारणांमुळे गत काही महिन्यांपासून अकोला शहरातील वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले असून, डिसेंबर-२०२३ महिन्यातील ३१ पैकी ३० दिवस वायू प्रदूषण आढळल्याची नोंद महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आहे.

शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २१ दिवस १०१ या प्रदूषित श्रेणीपेक्षा अधिक नोंदविला गेला, तर केवळ एक दिवस एक्यूआय चांगल्या श्रेणीचा आढळला. अलीकडच्या काळात फारसे औद्योगिकीकरण न झालेल्या जिल्ह्यांमध्येही वायू प्रदूषण वाढीस लागले आहे. वाहनांची वाढती संख्या, त्यातून निघणारा धूर, रस्त्यावरील धूळ, कचरा ज्वलन, बांधकाम आदी अनेक कारणांमुळे उद्योग नसणाऱ्या शहरांची हवा प्रदूषित होत आहे. हिवाळ्यात थंडीमुळे धूळ आणि धूर जमिनीजवळ येतो, वारे मंद असतात किंवा कधी इन्व्हर्शन तापमान असल्याने शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक(AQI) वाढतो. अकोला शहरातही हाच प्रकार घडत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रामदास पेठ स्थित केंद्राच्या आकडेवारीवरून लक्षात येते. डिसेंबर महिन्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंद केलेल्या आकडेवारीनुसार शहरात ३१ पैकी ३० दिवस प्रदूषण आढळले.

डिसेंबर महिन्याचा हवा गुणवत्ता निर्देशांक
निर्देशांक : श्रेणी : किती दिवस
० ते ५० : चांगला : ०१
५१ ते १०० : समाधानकारक : ०९
१०१ ते २०० : प्रदूषित : २०
२०१ ते ३०० : जास्त प्रदूषित : ०१
३०१ ते ४०० : अति प्रदूषित : ००
४०१ ते ५००० : धोकादायक प्रदूषण : ००


वाढती वाहने, धुळीचे रस्ते, कचरा ज्वलन, कोळसा ज्वलन आदी कारणांमुळे वायू प्रदूषणात वाढ होत आहे. वृक्ष संख्येत वाढ करणे, वाहनांच्या संख्येत कमी करणे, कचरा न जाळणे, उद्योगांनी प्रदूषण रोखणे अशा विविध उपाययोजना राबविण्यात आल्या तरच प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येऊ शकेल.
- प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरण अभ्यासक, चंद्रपूर

Web Title: 30 out of 31 days of December polluted; 21 days of AQI greater than 101

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी