पंदेकृविचे ३0 टक्के क्षेत्र नापेर !
By admin | Published: August 6, 2016 01:45 AM2016-08-06T01:45:03+5:302016-08-06T01:45:03+5:30
पश्चिम विदर्भातील सतत पावसाचा परिणाम; आतापर्यंंत १४0 टक्के पाऊस.
अकोला, दि. ५: पश्चिम विदर्भात यावर्षी सतत पाऊस सुरू असून, आतापर्यंंत १४0 टक्के पावसाची नोंद झाली आहे. परिणामी काही ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. यावर्षी बीजोत्पादनाचा अतिरिक्त कार्यक्रम घेणार्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रावरील ३0 टक्के क्षेत्र नापेर आहे.
सलग चार वर्षांंच्या अनिश्चिततेनंतर यावर्षी पावसाचे दमदार आगमन झाले आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून सतत पाऊस सुरू असून, ५ ऑगस्टपर्यंंत पश्चिम विदर्भात सरासरी ४0 टक्के पाऊस अधिक झाला आहे. या सततच्या पावसामुळे पेरण्यावर परिणाम तर झालाच पेरणी केलेल्या पिकांना डवरणी, निंदणी व कीटकनाशके फवारणीसाठी वेळच मिळत नसल्याने पिकावर प्रतिकूल परिणाम होत आहेत. यावर्षीच्या दमदार पावसामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बीजोत्पादन कार्यक्रमासोबतच कृषी विद्यापीठाच्या अडीच हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले होते. तथापि, पाऊस उसंतच देत नसल्याने कृषी विद्यापीठाचे मुख्य बीजोत्पादन प्रक्षेत्र व मध्यवर्ती संशोधन केंद्रांतर्गत ३0 टक्के क्षेत्रावरील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकर्यांना देण्यासाठी यावर्षी या क्षेत्रावर अतिरिक्त बीजोत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. तथापि, त्यावर परिणाम झाला आहे. दरम्यान, कृषी विद्यापीठाने या क्षेत्रावर आता अर्ध रब्बीचे नियोजन सुरू केले आहे.
यावर्षी पश्चिम विदर्भातील अकोला जिल्हय़ात सर्वाधिक ५९५.५ मि.मी. म्हणजेच १५0 टक्के पाऊस झाला असून, सतत २३ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. कृषी विद्यापीठाचे मुख्य बीजोत्पादन प्रक्षेत्र व मध्यवर्ती संशोधन केंद्र याच जिल्हय़ात असल्याने पेरणीवर परिणाम झाला आहे. अमरावती जिल्हय़ात आतापर्यंंत ६७२ मि.मी. म्हणजेच १४७ टक्के पाऊस झाला आहे. वाशिम जिल्हय़ात ६५६.२ मि.मी. १४४ टक्के, बुलडाणा जिल्हय़ात ५१५.४ मि.मी. १३८ टक्के तर यवतमाळ जिल्हय़ात ६५९ मि.मी. म्हणजेच १२६ टक्के पाऊस झाला आहे.
यावर्षी चांगला पाऊस झाल्याने ७0 टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे; परंतु जेथे भारी व काळी जमीन आहे त्या ठिकाणी सततच्या पावसामुळे शेतात शिरणे शक्य नसल्याने अशा जवळपास ३0 टक्के क्षेत्रावर पेरणी शिल्लक आहे. या क्षेत्रावर अर्ध रब्बीचे नियोजन करता येईल.
- डॉ. डी.एम. मानकर,
संशोधन संचालक,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.