‘आरटीई’च्या २५ टक्के राखीव जागांसाठी तीन हजारांवर पालकांचे अर्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 02:35 PM2019-03-15T14:35:58+5:302019-03-15T14:36:04+5:30
गत १० दिवसांमध्ये जिल्ह्यातून तब्बल ३ हजार ६१६ आॅनलाइन अर्ज शिक्षण विभागाच्या पोर्टलवर भरण्यात आले आहेत.
अकोला: शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. या राखीव जागांसाठी आॅनलाइन प्रवेश स्वीकारण्यात येत आहे. गत १० दिवसांमध्ये जिल्ह्यातून तब्बल ३ हजार ६१६ आॅनलाइन अर्ज शिक्षण विभागाच्या पोर्टलवर भरण्यात आले आहेत. जिल्ह्यातील आरटीई नोंदणीकृत २०७ शाळांमध्ये २३५६ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्याचा कालावधी ५ ते २२ मार्चपर्यंत राहणार आहे. यंदा आरटीई प्रवेशासाठी २०७ शाळा पात्र ठरल्या आहेत. प्रवेशासाठी किमान वय ६ वर्षे 0 महिने १ दिवस ते ६ वर्षे ११ महिने २९ दिवस एवढे आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्ह्यातील आरटीई नोंदणीकृत शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया ५ मार्चपासून सुरू झाली. जिल्ह्यातील खासगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित २0७ शाळांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २२ मार्चपर्यंत पालकांना २५ टक्के मोफत प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. त्यानंतर शिक्षण विभागाकडून प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. वेळापत्रकानुसार पहिल्या राउंडमध्ये शाळेपासून एक किमी किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरील पाल्यांचा प्रवेशासाठी विचार केला जाईल. यंदा जागा कमी असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात पालकांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. २२ मार्चपर्यंत जवळपास सात हजारांवर आॅनलाइन अर्ज प्राप्त होण्याचा अंदाज आहे. गतवर्षी २४८२ जागा असतानासुद्धा केवळ १९00 पाल्यांनाच इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळाला. उर्वरित जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत न्याय द्यावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील १२६ जागा घटल्या!
गतवर्षी जिल्ह्यात आरटीई संलग्नित इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के प्रमाणे २४८२ जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. यंदा मात्र त्यात २३५६ जागा राखीव ठेवल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत राखीव जागांमध्ये १२६ ने घट झाली आहे.