७० रेल्वे गाड्यांमध्ये आढळले तब्बल ३०२२ ‘फुकटे’; विनातिकीट प्रवाशांकडून १७ लाखांचा दंड वसूल
By Atul.jaiswal | Published: March 15, 2023 06:24 PM2023-03-15T18:24:30+5:302023-03-15T18:26:15+5:30
एका दिवसात विनातिकीट आढळलेल्या ३,०२२ प्रवाशांवर कारवाई करत १७ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
अकोला - विनातिकीट प्रवास करून रेल्वेचा महसूल बुडविणाऱ्यांना जरब बसावी या हेतूने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने बुधवारी विभागातील अकोला रेल्वेस्थानकासह सात मोठे रेल्वेस्थानक व अप आणि डाऊन मार्गावरील ७० रेल्वे गाड्यांमध्ये तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत एका दिवसात विनातिकीट आढळलेल्या ३,०२२ प्रवाशांवर कारवाई करत १७ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. एस. केडिया यांच्या नेतृत्वात मुख्य विभागीय वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभाग व रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने खंडवा ते इगतपुरी, अमरावती ते भुसावळ, चाळीसगाव-धुळे, जलंब-खामगाव सेक्शनमध्ये वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासणीस आणि आरपीएफचे संयुक्त पथक तयार करून सुमारे ७० गाड्यांची तपासणी करण्यात आली. नाशिक, मनमाड, भुसावळ, खांडवा, अकोला, बडनेरा या स्थानकांवरही तपासणी करण्यात आली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तीन अधिकारी, तिकीट चेकिंग स्टाफ, वाणिज्य कर्मचारी व आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या ४२ चमूंनी सहकार्य केले.
रेल्वेत प्रवास करताना योग्य ते तिकीट घेऊन ज्या श्रेणीचे तिकीट आहे त्याच श्रेणीच्या डब्यात प्रवास केला पाहिजे. तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याचा त्रास नको असेल तर प्रवाशांनी युटीएस ॲपचा वापर करावा.
- शिवराज मानसपुरे, मुख्य विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, भुसावळ