पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात ३०५ तक्रारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 02:23 PM2019-01-08T14:23:30+5:302019-01-08T14:23:50+5:30
अकोला: जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सोमवारी घेण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात विविध विभागांसंबंधी नागरिकांकडून ३०५ तक्रारी प्राप्त झाल्या.
अकोला: जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सोमवारी घेण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात विविध विभागांसंबंधी नागरिकांकडून ३०५ तक्रारी प्राप्त झाल्या. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन तक्रारींचे तातडीने निवारण करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जनता दरबाराला जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर,मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम व इतर विभागप्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सभागृहात उपस्थित तक्रारकर्त्या नागरिकांकडे जाऊन तक्रारी स्वीकारल्या. मागील जनता दरबारात प्राप्त तक्रारींवर संबंधित विभागांमार्फत करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेत, सामूहिक व वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी पालकमंत्र्यांनी स्वीकारल्या. त्यामध्ये विविध विभागांसंबंधी जिल्ह्यातील नागरिकांकडून ३०५ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामध्ये महसूल, जिल्हा परिषद, पोलीस विभाग,मनपा, विद्युत विभाग, आदिवासी विकास विभाग, जिल्हा उपनिबंधक, समाजकल्याण, भूमिअभिलेख विभाग, कृषी विभाग, एसटी महामंडळ, पाटबंधारे विभाग, कृषी विद्यापीठ,जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा अग्रणी बँक, समाजिक वनीकरण व इतर विभागासंबंधी तक्रारींचा समावेश आहे. प्राप्त तक्रारींची दखल घेऊन नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले.
अशा करण्यात आल्या सामूहिक तक्रारी!
जनता दरबारात विविध प्रश्नांवर जिल्ह्यातील नागरिकांनी पालकमंत्र्यांकडे सामूहिक तक्रारी केल्या. त्यामध्ये मूर्तिजापूर येथील राजगुरू नगरमधील रहिवाशांनी दलित वस्तीमध्ये रस्ता, पाणी व सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या आदी सुविधा नसल्याची तक्रार दिली. तसेच धरणाच्या बॅक वॉटरचे पाणी शेतातून गेल्याने शेत खराब झाल्याची तक्रार बार्शीटाकळी तालुक्यातील ढाकलीच्या शेतकºयांनी केली. मनपा हद्दवाढीत समाविष्ट ग्रामपंचायतींच्या कर्मचाºयांचे महानगरपालिकेत समायोजन करण्याची मागणी ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्यावतीने करण्यात आली. मनपाने सेवेतून कमी केलेल्या अस्थायी कलाशिक्षकांना सेवेत सामावून घेण्याची मागणी अस्थायी कलाशिक्षकांच्यावतीने करण्यात आली.सामाजिक वनीकरण विभागात कामांत गैरव्यवहार झाल्याची तक्रार बार्शीटाकळी तालुक्यातील झोडगा व वस्तापूर या गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांकडे केली. शेतकºयांना त्रास देणारे चान्नी येथील तलाठी लाड यांची बदली करण्याची मागणी चान्नी येथील शेतकºयांनी पालकमंत्र्यांकडे केली. प्राप्त सामूहिक तक्रारींची दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले.