अकोला जिल्ह्यात फवारणीतून ३०६ जणांना विषबाधा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 04:22 PM2019-09-22T16:22:15+5:302019-09-22T16:22:22+5:30
दीड महिन्यातच ही रुग्णसंख्या १५० वरून ३०६ वर पोहोचली असून, यामध्ये अकोल्यासह वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
अकोला : सर्वोपचार रुग्णालयात गत महिनाभरापासून फवारणीतून विषबाधेच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. दीड महिन्यातच ही रुग्णसंख्या १५० वरून ३०६ वर पोहोचली असून, यामध्ये अकोल्यासह वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
शेतात फवारणीच्या कामांना वेग असतानाच अकोल्यासह बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर येऊ लागले. आॅगस्ट महिन्यात फवारणीतून विषबाधा झाल्याचे १५० रुग्ण येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाले होते; मात्र विषबाधेचे हे सत्र सप्टेंबरमध्येही कायम राहिले. सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात सर्वाेपचार रुग्णालयात विषबाधेचे ७४ रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी ४९ रुग्ण हे फवारणीतून विषबाधा झालेले आहेत. सर्वोपचार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यात आणखी रुग्णांची भर पडत गेली. दररोज आठ ते दहा विषबाधेचे रुग्ण दाखल होत आहेत; मात्र यासाठी सर्वोपचार रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. ८ सप्टेंबरपर्यंत सर्वोपचार रुग्णालयात २०० पेक्षा जास्त रुग्ण विषबाधेचे दाखल झाले होते. त्यानंतर आठवड्याभरात ही संख्या ३०६ वर पोहोचली. यामध्ये अकोला जिल्ह्यातील २५७ रुग्ण आहेत, तर वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील ५० रुग्णांचा समावेश आहे. यातील तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, बहुतांश रुग्णांना ‘मोनोक्रोटोफॉस’ या प्रतिबंधित कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती वैद्यकीय अधिकाºयांनी दिली आहे; परंतु या रुग्णांवर उपचारासाठी आरोग्य यंत्रणा तोकडी ठरत आहे. एकीकडे मनुष्यबळाची समस्या, तर दुसरीकडे उपलब्ध खाटांची समस्या. त्यामुळे जागा मिळेल तिथे या रुग्णांना ठेवण्यात येत आहे. सध्या सर्वोपचार रुग्णालयात ३७ रुग्णांवर उपचार सुरू आहे; परंतु दररोज येणाºया रुग्णांची संख्या पाहता आरोग्य यंत्रणा अपुरी ठरणार असल्याचे संकेत गत काही दिवसांच्या कामकाजातून दिसून येत आहेत.
आतापर्यंत तिघांचा बळी
सर्वोपचार रुग्णालयात दाखल फवारणीतून विषबाधेच्या रुग्णांपैकी आतापर्यंत तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाºयांनी दिली आहे.
‘पीएचसी’ व ग्रामीण रुग्णालयात उपचार नाहीच!
फवारणीतून विषबाधा झाल्यास रुग्णांना थेट अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात येते; परंतु रुग्णांना ग्रामीण भागातच प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात योग्य उपचाराची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्ह्यातीलच नाही, तर वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील रुग्णही सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात येत आहेत.