जिल्हा परिषद आवारात ३१ लाखांच्या कामांना मंजुरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:18 AM2021-03-25T04:18:30+5:302021-03-25T04:18:30+5:30
अकोला: जिल्हा परिषद आवारात ३१ लाख रुपयांची विकासकामे करण्यास जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या विशेष सभेत बुधवारी मंजुरी देण्यात आली. ...
अकोला: जिल्हा परिषद आवारात ३१ लाख रुपयांची विकासकामे करण्यास जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या विशेष सभेत बुधवारी मंजुरी देण्यात आली. मंजुरी देण्यात आलेल्या कामांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ) कार्यालय दुरुस्ती कामांचाही समावेश आहे.
जिल्हा परिषद आवारात १५ लाख रुपयांच्या निधीतून पेव्हर रस्ते, ३ लाख रुपयांच्या निधीतून मुख्य लेखा व वित्त अधिकारी कार्यालयाच्या भांडारगृहाची दुरुस्ती, ३ लाख रुपयांच्या निधीतून मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाची दुरुस्ती, ३ लाख रुपयांच्या निधीतून अध्यक्ष कार्यालयाची दुरुस्ती व ७ लाख रुपयांच्या निधीतून जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानाची दुरुस्ती इत्यादी ३१ लाख रुपये खर्चाची कामे करण्यास जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष तथा बांधकाम सभापती प्रतिभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विशेष सभेला समितीचे सदस्य सुनील धाबेकर, विनोद देशमुख, मीरा पाचपोर यांच्यासह जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश केने व संबंधित अधिकारी उपस्थित होते.