३३ रस्त्यांच्या दर्जोन्नतीचा ठराव फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 01:44 PM2020-03-04T13:44:32+5:302020-03-04T13:44:55+5:30
यासाठीचा ठराव बुधवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत येताच फेटाळण्यात आला.
अकोला : ग्रामीण व इतर जिल्हा मार्गांची कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूून करण्यासाठी अनेक रस्ते आधीच जिल्हा परिषदेकडून हिरावण्यात आले. आता ३३ रस्त्यांची दर्जोेन्नती करून ती कामे शासनाकडून व्हावी, यासाठीचा ठराव बुधवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत येताच फेटाळण्यात आला. या कामांसाठी जिल्हा परिषदेलाच निधी द्यावा, त्यासाठी जिल्हा परिषद सक्षम आहे, असा पवित्रा सदस्यांनी घेतला.
विषय पत्रिकेत नमूद असलेला जिल्ह्यातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याचा ठराव होता. त्यावर सदस्य डॉ. प्रशांत अढाऊ यांनी आक्षेप घेत या रस्त्यांची कामे जिल्हा परिषनेकडूनच केली जावी, त्यासाठी दर्जोन्नतीचा ठराव न घेता जिल्हा परिषदेला निधी द्यावा, त्यासाठी लेखाशीर्ष उघडावे, अशी मागणी केली. गटनेते गोपाल दातकर यांनी मुद्दा रेटत या ठरावाबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचे म्हटले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या नियोजन आराखड्यात शेतरस्त्यांची कामे नसल्याने तो मंजूर करू नये, असा पवित्रा गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, गजानन पुंडकर, दातकर यांनी घेतला. या आराखड्याला विलंब झाला. तो मंजूर करणे आवश्यक आहे, त्यामध्ये बदल करावयाचा असल्यास पुरवणी आराखडाही करता येईल, असे सीईओ डॉ. पवार यांनी सांगितले. त्यावर शेतरस्त्यांच्या कामाबाबत ग्रामपंचायतींचे प्रस्ताव, सदस्यांची शिफारस घेऊन पुरवणी आराखडा तयार करा, असे सदस्यांनी सांगितले.
- दूधपूर्णा योजनेचा बट्ट्याबोळ
रोहयोच्या कुशल कामांचा २.७५ कोटी रुपये निधी थकीत आहे. तो तातडीने मिळावा, यासाठी प्रयत्न करा, असे सुलताने यांनी म्हटले. सीईओंच्या निवासस्थानावर केलेला खर्च अति झाला, दूधपूर्णा योजनेचा बट्ट्याबोळ झाला. परिसरात दूध विक्री केंद्र निर्मितीसाठी ५० हजार खर्च केले. त्याला कोण जबाबदार, याची माहिती सदस्य पुष्पा इंगळे यांनी मागितली. त्यावर डॉ. मिश्रा, कार्यकारी अभियंता सुनील सोनवणे यांनी दिलेल्या उत्तराने सदस्यांमध्ये हशा पिकला.
- पाणंद नव्हे शेतरस्तेच करा- सुलताने
पालकमंत्री योजनेतून पाणंद रस्त्यांसाठी केवळ ५० हजार रुपये दिले जातात. त्यातून कोणतीच कामे होत नाहीत. त्यामुळे पाणंद नव्हे तर शेतरस्त्यांचेच प्रस्ताव तयार करा, अशी मागणी ज्ञानेश्वर सुलताने यांनी लावून धरली.
- सभेत मंजूर ठराव
हातोला येथे खुले नाट्यगृह बांधकाम पाडणे, कोळासा येथील ग्रामपंचायत पाडणे, नैराट, सांगळूद येथील आरोग्य उपकेंद्र इमारतीच्या बांधकाम अंदाजपत्रक मंजूर, प्राथमिक आरोग्य केंद्र सस्ती येथे निवासस्थान बांधकाम, तीर्थक्षेत्र कामाच्या प्रस्तावात बदल करणे, सांगळूद येथील इमारत पाडणे, हातोला व हातरूण येथील शिकस्त अंगणवाडी इमारत पाडणे, राहणापूर ते धारूर रस्ता बांधकाम करणे, जितापूर ते करी रूपागड रस्ता बांधकाम, पांढुर्णा नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
- हातपंप दुरुस्तीचा ठरावही पुढील सभेत
जिल्ह्यातील हातपंप दुरुस्तीचे काम खासगी कंत्राटी पद्धतीने देण्याच्या ठरावाला सदस्यांनी आक्षेप घेतला. वसुली नसल्याने मंजुरी देऊ नये, असे पुंडकर म्हणाले. त्यामुळे तो पुढील सभेत ठेवला जाणार आहे. वसुली न करणाऱ्या ग्रामपंचायतींची खातेचौकशी करा, अशी मागणी चंद्रशेखर चिंचोळकर यांनी केली.
- दोन समित्यांवर इंगळे यांची निवड
जिल्हा परिषदेच्या वित्त व आरोग्य समितीवर सदस्य म्हणून पुष्पा इंगळे यांची निवड करण्यात आली.