पश्चिम विदर्भात ३३ हजारावर कृषीपंप वीज जोडणी प्रलंबित
By atul.jaiswal | Published: August 14, 2018 03:04 PM2018-08-14T15:04:18+5:302018-08-14T15:05:23+5:30
अकोला : राज्यातील शेतकऱ्यांना कृषीपंपांसाठी वीज जोडण्या देण्याला महावितरणकडून प्राधान्य दिले जात असले, तरी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये अजुनही ३३ हजार ३४५ कृषीपंप वीज जोडण्या प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला : राज्यातील शेतकऱ्यांना कृषीपंपांसाठी वीज जोडण्या देण्याला महावितरणकडून प्राधान्य दिले जात असले, तरी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये अजुनही ३३ हजार ३४५ कृषीपंप वीज जोडण्या प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत प्रलंबित असलेल्या कृषीपंपांना यापुढे उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे (एचव्हीडीएस)वीज जोडणी देण्यासाठी महावितरण पाऊल टाकले आहे.
कृषीपंपांना वीज जोडण्यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. यासाठी विविध योजना काढल्यानंतरही हा अनुशेष कमी होण्याची चिन्हे नाहीत. राज्यभरातील हजारो शेतकरी अजुनही कृषीपंप जोडणी मिळण्यासाठी प्रतिक्षा करत आहेत. आतापर्यंत पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये ३३ हजार ३४५ कृषी पंप ग्राहकांनी पैसे भरल्यानंतरही त्यांना वीज जोडणी मिळालेली नाही. यामध्ये अकोला जिल्ह्यातील ५७२१, बुलडाणा जिल्ह्यातील ७६९९, वाशिम जिल्ह्यातील ७१५९, अमरावती जिल्ह्यातील ५३०९ व यवतमाळ जिल्ह्यातील ७४०७ कृषी पंप वीज जोडण्या प्रलंबित आहेत.
उच्चदाब वितरण प्रणाली ठरणार फायदेशिर
शेतकºयांच्या कृषीपंपांना जोडणी देण्यासाठी उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) सुरु करण्यात येणार आहे. नव्या उच्चदाब प्रणालीत उच्चदाब वाहिन्यांवर आकडे टाकून वीजचोरी करता येणार नाही. नव्या प्रणालीमध्ये एका रोहित्रावरून दोन अथवा जास्तीत जास्त तीनच कृषिपंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे रोहित्रावर ताण येणार नाही. तो जळणार नाही. आकडा टाकून वीज घेता येणार नाही. ही प्रणाली राबविण्यासाठी नागपूर परिक्षेत्रातील नागपूर, चंद्रपूर, गोंदीया, अकोला आणि अमरावती या पाचही परिमंडलाने निविदा प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.