गुढीपाडव्यालाही जिल्ह्यातील ३.३१ लाख गरीब कुटुंबांना मिळाला नाही ‘आनंदाचा शिधा’!
By संतोष येलकर | Published: March 23, 2023 07:19 PM2023-03-23T19:19:17+5:302023-03-23T19:20:20+5:30
पुरवठादारांकडून शिधा जिन्नसांचा पुरवठा होणार तरी कधी?
संतोष येलकर -
अकोला: गुढीपाडवा आणि महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गरीब रेशनकार्डधारक कुटुंबांना रेशन दुकांनांमधून ‘आनंदाचा शिधा’ दिला जाणार असल्याचे शासनामार्फत गेल्या महिन्यात घोषित करण्यात आले; मात्र गुढीपाडवा होऊन गेला, तरी जिल्ह्यातील ३ लाख ३१ हजार ३५७ गरीब रेशनकार्डधारक कुटुंबांना अद्याप ‘आनंदाचा शिधा’ मिळाला नाही. यामुळे रेशनकार्डधारक कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्यासाठी शासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या पुरवठादारांकडून शिधा जिन्नसांचा पुरवठा होणार तरी कधी? असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
अंत्योदय अन्न योजनेतील रेशनकार्डधारकांसह प्राधन्य कुटुंब आणि एपीएल शेतकरी इत्यादी गरीब रेशनकार्डधारक कुटुबांना गुढीपाडवा आणि महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १०० रुपयांत प्रतिकुटुंब एक किलो रवा, एक किलो हरभरा डाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल इत्यादी शिधा जिन्नसांचा ‘आनंदाचा शिधा’ रेशन दुकानांमधून दिला जाणार असल्याचे शासनामार्फत गेल्या महिन्यात घोषित करण्यात आले. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील पात्र गरीब रेशनकार्डधारकांना ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्यासाठी रवा, डाळ, साखर व पामतेल इत्यादी शिधा जिन्नसांची मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत गेल्या १ मार्च रोजी शासनाच्या पुरवठा विभागाकडे नोंदविण्यात आली; परंतु शासनामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या पुरवठादाराकडून संबंधित शिधा जिन्नसांचा पुरवठा अद्यापही जिल्ह्यात करण्यात आला नाही. त्यामुळे गुढीपाडवा होऊन गेला तरी २३ मार्चपर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ३१ हजार ३५७ गरीब रेशनकार्डधारक कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ मिळाला नाही. त्याअनुषंगाने मागणीप्रमाणे पुरवठादाराकडून रवा, डाळ, साखर व पामतेल इत्यादी शिधा जिन्नसांचा पुरवठा जिल्ह्यात होणार तरी कधी आणि रेशन दुकानांमधून जिल्ह्यातील गरीब लाभार्थी कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
लाभार्थी कुटुंबांची अशी
आहे तालुकानिहाय संख्या!
तालुका कुटुंबे
अकोला ग्रामीण ६४,३४०
अकोला शहर ४१,४४२
अकोट ४५,१२०
बाळापूर ४०,२१७
बार्शी टाकळी ३६,२०४
मूर्तिजापूर ४१,४०१
पातूर २९,६७९
तेल्हारा ३८,०००