अकोला जिल्ह्यातील ३३२ खासगी अनुदानित माध्यमिक शाळांची संचमान्यता पूर्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 12:14 PM2018-09-02T12:14:37+5:302018-09-02T12:16:08+5:30
अकोला : जिल्ह्यातील ३४७ खासगी अनुदानित माध्यमिक शाळांपैकी ३३२ शाळांची संचमान्यता पूर्ण करण्यात आली आहे. उ
अकोला : जिल्ह्यातील ३४७ खासगी अनुदानित माध्यमिक शाळांपैकी ३३२ शाळांची संचमान्यता पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित १५ शाळांची संचमान्यता लवकरच पूर्ण करण्यात येईल. संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय शाळांमधील विद्यार्थी संख्या, अतिरिक्त शिक्षकांची संख्या, शाळांमधील एकूण पदे याचा अंदाज येत नाही. ३३२ शाळांची संचमान्यता पूर्ण झाल्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयाने अतिरिक्त शिक्षकांची माहिती मागविली असून, सप्टेंबर महिन्यात अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.
संचमान्यता पूर्ण करण्यासाठी शाळांना शालार्थ प्रणालीमध्ये आॅनलाइन विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षक संख्या भरावी लागते. ही माहिती केंद्रप्रमुख तपासून त्याविषयी अंतिम निर्णय घेतात आणि नंतर ही माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉगिनला जाते. पुन्हा ही माहिती प्राथमिक शिक्षणाधिकाºयांकडून तपासणी करून पुणे येथील शिक्षण संचालकांकडे पाठविली जाते. या ठिकाणी संचमान्यता तयार झाल्यानंतर विद्यार्थी संख्या आणि विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांच्या पदांना मान्यता मिळते. ही प्रक्रिया ३४७ पैकी ३३२ माध्यमिक शाळांनी पूर्ण केली आहे. या शाळा संपूर्ण माहिती शिक्षणाधिकाºयांकडे उपलब्ध झाली आहे. उर्वरित १५ शाळांचीही संचमान्यता लवकरच पूर्ण करण्यात येईल. ९५ टक्के संचमान्यता पूर्ण झाल्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षक, विषय, आरक्षणनिहाय पदांच्या संख्या आदी माहिती मागितली आहे. ही संपूर्ण माहिती प्राप्त झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांच्या नावांची यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांच्या हरकती, आक्षेप ऐकून घेतले जातील. त्यावर सुनावणी झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील ९५ टक्के माध्यमिक शाळांची संचमान्यता पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित शाळांची लवकरच संचमान्यता पूर्ण होईल. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी शाळांकडून माहिती मागविण्यात येत आहे.
प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी,
माध्यमिक जि.प.