११ दिवसांत ३३५ कोटी थकबाकी वसुलीचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:17 AM2021-03-21T04:17:35+5:302021-03-21T04:17:35+5:30
विविध वीजनिर्मिती कंपन्यांकडून वीज विकत घेणे आणि ती आपल्या ग्राहकांना देणे हा मुख्य व्यवसाय महावितरणचा असल्याने आपल्या ग्राहकांची ...
विविध वीजनिर्मिती कंपन्यांकडून वीज विकत घेणे आणि ती आपल्या ग्राहकांना देणे हा मुख्य व्यवसाय महावितरणचा असल्याने आपल्या ग्राहकांची विजेची सोय करण्यासाठी महावितरणला वेळोवेळी वीज निर्मिती - पारेषण कंपन्यांची देयके अदा करणे क्रमप्राप्त असते. परंतु गेल्या ११ महिन्यांत महावितरणने केवळ उधारीवर वीज वितरित केल्याने थकबाकी एवढी वाढली आहे की, महावितरणला आपला व्यवहार चालविण्याचे आव्हान निर्माण झाले.
वीज देयकाची थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. मार्च महिन्याचे शेवटचे ११ दिवस शिल्लक राहिले असताना परिमंडलातील सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून ३३५ कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट बाकी आहे. यामध्ये अकोला जिल्हा १५८.८९ कोटी, बुलडाणा जिल्हा २११.५१ कोटी आणि वाशिम जिल्हा ७२.६० कोटी रुपये याप्रमाणे थकबाकी आहे. थकबाकी वसुलीचे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांना आपले कसब दाखवत वसुली मोहीम अधिक तीव्र आणि कठोर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे थकबाकीदार वीज ग्राहकांनी वसुलीसाठी आलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.