जिल्हय़ात ३४ हजार दशलक्ष घनमीटर पाणीसाठय़ाची कामे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 01:43 AM2017-11-08T01:43:26+5:302017-11-08T01:44:10+5:30
अकोला : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गत दोन वर्षांच्या कालावधीत जिल्हय़ात ३२५ गावांमध्ये ३४ हजार ५३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध करणारी ८ हजार ५५ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
संतोष येलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गत दोन वर्षांच्या कालावधीत जिल्हय़ात ३२५ गावांमध्ये ३४ हजार ५३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध करणारी ८ हजार ५५ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
राज्यात वारंवार निर्माण होणार्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सन २0१५-१६ या वर्षात अकोला जिल्हय़ात २00 गावांची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये ६ हजार ७४८ कामे पूर्ण करण्यात आली. ९३ कोटी १५ लाख रुपये खर्च करून करण्यात आलेल्या ‘जलयुक्त शिवार’च्या कामांद्वारे २२ हजार ५९९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा अपेक्षित आहे. सन २0१६-१७ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हय़ात १२५ गावांची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये २ हजार ७६४ प्रस्तावित कामांपैकी १ हजार ३0७ कामे पूर्ण करण्यात आली. २९ कोटी २४ लाख रुपये खर्च करण्यात आलेल्या ‘जलयुक्त शिवार’च्या या कामांतून ११ हजार ९३८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणे अपेक्षित आहे. सन २0१५-१६ व २0१६-१७ या दोन वर्षांच्या कालावधीत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हय़ातील ३२५ गावांमध्ये ८ हजार ५५ कामे पूर्ण करण्यात आली असून, या कामांद्वारे ३४ हजार ५३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
१४४ गावांसाठी ८६ कोटींचा आराखडा!
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २0१७-१८ या वर्षात जिल्हय़ातील १४४ गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे करण्यासाठी ३ हजार ४२७ कामांकरिता ८६ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचा आराखडा कृषी विभागामार्फत तयार करण्यात आला आहे.
४९ हजार १३३ हेक्टर संरक्षित ओलिताचा लाभ!
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गत दोन वर्षांत जिल्हय़ात पूर्ण करण्यात आलेल्या कामांद्वारे ३४ हजार ५३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. या पाणीसाठय़ाचा जिल्हय़ातील ४९ हजार १३३ हेक्टर शेती क्षेत्राला संरक्षित ओलीतासाठी लाभ होणार आहे.
‘जलयुक्त शिवार’ विभागीय बैठक; पुरस्कार वितरण सोहळा आज अकोल्यात!
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अमरावती विभागीय आढावा बैठक आणि पुरस्कार वितरण सोहळा बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २0१५-१६, २0१६-१७ या दोन वर्षांतील अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्हय़ांतील कामांचा आढावा आणि २0१७-१८ मधील कामांच्या नियोजनाचा प्रकल्प अहवाल यासंदर्भात सकाळी १0 वाजता आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. आढावा बैठकीनंतर दुपारी ४ वाजता पुरस्कार वितरण सोहळ्याला मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे, कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह विभागातील पाचही जिल्हय़ांचे पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.