अन्नधान्याचे ३५ टक्के उत्पादन घटणार!

By admin | Published: July 15, 2017 02:05 AM2017-07-15T02:05:43+5:302017-07-15T02:05:43+5:30

विदर्भातील पेरण्या खोळंबल्या; उलटल्याचा परिणाम

35 percent of foodgrains production will fall! | अन्नधान्याचे ३५ टक्के उत्पादन घटणार!

अन्नधान्याचे ३५ टक्के उत्पादन घटणार!

Next

राजरत्न सिरसाट।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने खरीप पिकांची पेरणी खोळंबली असून, पेरलेली पिके उधळल्याने आजमितीस एकट्या विदर्भातील ३० ते ३५ टक्के उत्पादन घटणार आहे. राज्यातील परिस्थितीदेखील चिंताजनक असून, कृषी अर्थव्यवस्थेला हा मोठा फटका मानला जात आहे.
राज्यातील खरीप हंगामातील पेरणी क्षेत्र १४९.४२ लाख हेक्टर आहे. यातील ८४.३४ लाख हेक्टरवर (५६ टक्के) पेरणी झाली आहे. याचाच अर्थ ४४ लाख हेक्टर क्षेत्र नापेर आहे. दरवर्षी सरासरी ४१.५८ लाख हेक्टरवर तृणधान्याची पेरणी केली जाते. यावर्षी ती १३.५० लाख हेक्टरवरच झाली आहे. कडधान्याच्या २१.०९ लाख हेक्टरपैकी १३.२८ लाख हेक्टर पेरणी झाली आहे. तेलबिया पिकांच्या ३५.३८ लाख हेक्टरपैकी २६.०४ लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. राज्यात कापसाचे सरासरी क्षेत्र ४१.२९ हेक्टर आहे. त्यापैकी ३१.३६ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. उसाच्या ९.७८ लाखपैकी ०.१६ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. विभागनिहाय आकडेवारी बघितल्यास कोकणात १६ टक्केच पेरणी झाली आहे. नाशिक विभागात ५५ टक्के, पुणे ५१ टक्के, कोल्हापूर ५१ टक्के, औरंगाबाद ८६ टक्के, लातूर ७० टक्के, अमरावती ६८ तर नागपूर विभागात ३३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
अद्याप दमदार व सार्वत्रिक पाऊस नसल्याने विदर्भ, खान्देश तसेच मराठवाड्यातील कापसाचे पीक अखेरच्या घटका मोजत आहे. सोयाबीनची परिस्थितीही तशीच आहे. विदर्भातील खरिपाचे क्षेत्र ५९ लाख हेक्टर आहे.
यात पूर्व विदर्भात धानाचे क्षेत्र ७.५ लाख हेक्टर आहे. अद्याप धान पिकाची रोवणी झाली नाही. त्याचा फटका या पिकाला बसला आहे. या पिकाचे उत्पादन हेक्टरी १२ लाख क्विंटल आहे. आजच ३० टक्के उत्पादन घटले आहे.

पेरणी अहवालावर निर्बंध?
खरीप हंगामातील पेरणीचा अहवाल कृषी विभागातर्फे दरवर्षी जाहीर करण्यात येत होता. तथापि, यावर्षी कृषी विभागाने हा अहवाल देण्यास असमर्थता दर्शविली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच अहवाल देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ७ जुलैपर्यंतचाच अहवाल कृषी विभागाने प्रसिद्ध केला आहे.

पेरण्या खोळंबल्या असून, दुबार, तिबार पेरण्या केल्यावरही पाऊस नाही. परिणामी विदर्भ नव्हे तर राज्यातील ३० टक्क्याच्यावर अन्नधान्याचे उत्पादन आजच घटले आहे.
- डॉ. शरद निंबाळकर,
माजी कुलगुरू ,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

Web Title: 35 percent of foodgrains production will fall!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.