७० कोटींच्या थकीत कर वसुलीसाठी मनपाचे ३५ पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 10:48 AM2019-02-09T10:48:04+5:302019-02-09T10:48:09+5:30
अकोला: अकोलेकरांवर थकीत असलेल्या ७० कोटींच्या थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेने ३५ पथकांचे गठन केले असून, हे पथक शनिवारपासून कार्यान्वित होत आहे.
अकोला: अकोलेकरांवर थकीत असलेल्या ७० कोटींच्या थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेने ३५ पथकांचे गठन केले असून, हे पथक शनिवारपासून कार्यान्वित होत आहे. महापालिकेतील इतर विभागातील १०५ कर्मचाºयांना या पथकांत सहभागी करण्यात आले आहे. नव्याने गठित झालेले ३५ पथक शनिवारपासून करवसुलीसाठी प्रत्यक्ष थकीतदार असलेल्या घरमालकांना भेटणार आहे. मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या पुढाकारात सुरू झालेल्या या प्रयोगास किती प्रतिसाद मिळतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
अकोला महापालिका प्रशासनापुढे मार्च अखेरपर्यंत ७० कोटी वसुलीचे उद्दिष्ट आहे. १०३ कोटींच्या थकीत वसुलीपैकी केवळ ३० कोटी रुपये वसूल करण्यात मनपा प्रशासनाला यश आले. आता महापालिका प्रशासनाला ७० कोटीं रुपयांचा कर मार्च अखेरपर्यंत वसूल करायचा आहे. अवघ्या ५० दिवसांच्या आत एवढी रक्कम वसूल करणे अशक्य दिसत असल्याने आता मनपा आयुक्त यांनी मनपातील इतर विविध विभागातील १०५ कर्मचाºयांना या मोहिमेवर घेतले आहे. शुक्रवारी या १०५ कर्मचाºयांना त्यांच्यावरील जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. प्रत्येकी तीन कर्मचाºयांचे एक पथक घरोघरी जाऊन वसुली करणार आहे. प्रत्येक पथकाकडे शंभर थकीदरांची यादी देण्यात आली आहे. शनिवारपासून चारही झोन अंतर्गत हे पथक कार्यान्वित होत आहे. कर वसुलीच्या कार्यात असलेल्या कर्मचाºयांना त्यांचे दैनंदिन कामकाज सांभाळून कर वसुलीचे काम पाहायचे आहे. शनिवारीपासून कार्यान्वित होणाºया पथकाकडून काय प्रतिसाद मिळतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. ३१ मार्च २०१९ पर्यंत जर कर वसुली झाली नाही तर पगारवाढीवर टाच बसविण्याचा इशारा आधीच मनपा आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे या करवाढीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न मनपाचे अधिकारी-कर्मचारी करीत आहे. मनपा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत झालेल्या ३५ पथकांकडून खूप अपेक्षा आहे. ३१ मार्च आधी अनेक प्रयोग केले जाणार आहेत.
-विजय पारतवार, कर अधीक्षक, मनपा, अकोला.