राज्यातील ३५ हजार चित्रकला, क्रीडा शिक्षकांवर टांगती तलवार कायम
By admin | Published: December 16, 2014 12:49 AM2014-12-16T00:49:27+5:302014-12-16T00:49:27+5:30
अनेक शिक्षण संस्थांमध्ये कनिष्ठ शिक्षक, संचमान्यतेमध्ये पद मंजूर नाही.
अर्जुनकुमार आंधळे / देऊळगावराजा : राज्यभरातील ५ वी ते १0 वीपर्यंत वर्ग असलेल्या विद्यालयात प्रत्येकी एक पूर्णवेळ चित्रकला व क्रीडा शिक्षक अनिवार्य असताना तसेच नवीन आरटीई कायद्यात चित्रकला व क्रीडा शिक्षकांना विशेष प्राधान्य असताना अनेक शिक्षण संस्थांनी संस्थेमध्ये कनिष्ठ शिक्षक व संचमान्यतेमध्ये पद मंजूर नाही. या मुद्यावर बोट ठेवून राज्यातील ३४ हजार ७00 चित्रकला व क्रीडा शिक्षकांना २0१३ ते २0१४ च्या संचमान्यतेमध्ये विद्यार्थ्यांअभावी अतिरिक्त ठरविण्याचा घाट घातला जात आहे. राज्य शासनाच्या व न्यायालयाच्या आदेशानुसार चित्रकला आणि क्रीडा शिक्षक प्रत्येक शाळेत आवश्यक आहेत. कारण इतर कोणत्याही विषयाचे शिक्षक या दोन विषयांचे अध्यापन करू शकत नाही. राज्यातील ज्या शाळेत चित्रकला व क्रीडा शिक्षक कार्यरत आहेत, त्यांची संच मान्यतेमध्ये पदे मंजूर करून घेण्याचे काम संबंधित मुख्याध्यापकाचे असते. चित्रकला व क्रीडा शिक्षक हे विशेष शिक्षक असल्याने त्यांच्यासाठी वरिष्ठ आणि कनिष्ठ असा कोणताही भेदभाव नसतो. या दोन विषयांचे गांभीर्य लक्षात घेता माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी सदर शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ येणार नाही, याची दखल घेण्याची गरज आहे. राज्यभरातील जवळपास १५ हजार संगीत, चित्रकला शिक्षक व १९ हजार ७00 क्रीडा शिक्षकांच्या मनात अतिरिक्त ठरण्याच्या भीतीने घर केले आहे. या नैराश्येपोटी नांदेड येथील सय्यद रमिजोद्दीन या २४ वर्षीय तरुण चित्रकला शिक्षकाने ११ डिसेंबर २0१४ रोजी राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली होती. मृत्यूपूर्व चिठ्ठीत राज्याचे शिक्षणमंत्री व शिक्षण सचिव यांच्या नावांचा उल्लेख केल्याने चित्रकला व क्रीडा शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्याची गंभीर बाब या प्रकरणाने अधोरेखित झाली आहे.