रोजगार मेळाव्यात ३.५ हजारांवर युवक-युवतींना मिळाला रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 01:46 PM2018-10-05T13:46:06+5:302018-10-05T13:47:57+5:30
अकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या पुढाकारातून लरातो वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी आयोजित कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या रोजगार मेळाव्यातून तीन हजार ५११ युवक-युवतींनी मुलाखती देऊन नोकरीची संधी प्राप्त केली.
अकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या पुढाकारातून लरातो वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी आयोजित कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या रोजगार मेळाव्यातून तीन हजार ५११ युवक-युवतींनी मुलाखती देऊन नोकरीची संधी प्राप्त केली. रोजगार मेळाव्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथील ४६ नामांकित कंपन्यांनी सहभाग घेऊन योग्य उमेदवारांची निवड करून त्यांना नोकरीचे पत्र दिले.
दुपारी झालेल्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री रणजित पाटील यांच्या हस्ते मुलाखतीद्वारे नामांकित कंपन्यांमध्ये निवड झालेल्या युवक-युवतींना नोकरीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी माजी महापौर उज्ज्वला देशमुख, अशोक ओळंबे, जि.प. सदस्य अक्षय लहाने, ज्येष्ठ नगरसेवक हरीश आलिमचंदानी, नगरसेवक आशिष पवित्रकार, गोपी ठाकरे, रालतो विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी, संजय तिकांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सचिव असिमकुमार गुप्ता यांनी रोजगार मेळाव्यांची सध्या गरज आहे. यातूनच युवकांना रोजगार मिळतो, त्यामुळे सातत्याने रोजगार मेळावे आयोजित केल्या जातील. कंपनी आणि रोजगार इच्छुकांमध्ये आम्ही दुवा म्हणून काम करू. विदर्भातील युवकांना रोजगार मिळण्यासाठी आमचा विभाग प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या साक्षी गायधनी हिचा सत्कार करण्यात आला.
रोजगार मेळाव्यासाठी पश्चिम विदर्भातून दहा हजारांवर युवक-युवतींनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या हजारो युवक-युवतींची लरातो वाणिज्य महाविद्यालय, रालतो विज्ञान महाविद्यालय आणि सीताबाई कला महाविद्यालयांमध्ये नामांकित कंपनींच्या प्रतिनिधींनी मुलाखती घेतल्या. मुलाखतीद्वारे निवड झालेल्या ३ हजार ५११ उमेदवारांना नोकरीची संधी मिळाली. सकाळी ९ वाजतापासून रोजगार इच्छुक युवक-युवतींनी कार्यक्रमस्थळी गर्दी केली होती. मेळाव्यात आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती संपेपर्यंत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील लरातो वाणिज्य महाविद्यालयात थांबून होते.
अर्थमंत्री मुनगंटीवारांनी दिले नोकरीचे पत्र!
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते मनीषा अशोक इकडे (पुणे येथील कंपनी) मुकेश भीमराव थाटे (बारामती येथील कंपनी), शुभम समदुर (फियाट इंडिया पुणे), गजानन राठोड (मॅग्मा लि. पुणे), गणेश सपकाळ (फियाट इंडिया पुणे), अमित बोपटे, अजय उमाळे(मॅग्मा लि. पुणे) यांना नोकरीचे पत्र देण्यात आले.
१२ हजार लोकांची जेवणाची व्यवस्था
रोजगार मेळाव्यामध्ये पश्चिम विदर्भातून आलेल्या १0 हजारांवर उमेदवार व इतर लोकांसाठी ज्येष्ठ नगसेवक हरीश आलिमचंदानी यांनी खिचडीची व्यवस्था लरातो वाणिज्य महाविद्यालय परिसरात केली होती.