मनपाची मालमत्ता कर वसुली ३६ टक्केच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 01:40 PM2019-03-10T13:40:23+5:302019-03-10T13:40:26+5:30
अकोला: मार्च महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला असला, तरी अजून महापालिकेच्या कर वसुलीची आकडेवारी अद्याप पुढे सरकलेली नाही. ६ मार्च २०१९ पर्यंत मालमत्ता कर ३५.६७ टक्क्यांपर्यंतच पोहोचू शकले.
अकोला: मार्च महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला असला, तरी अजून महापालिकेच्या कर वसुलीची आकडेवारी अद्याप पुढे सरकलेली नाही. ६ मार्च २०१९ पर्यंत मालमत्ता कर ३५.६७ टक्क्यांपर्यंतच पोहोचू शकले. मार्च महिन्याच्या शेवटच्या चरणात ही आकडेवारी कितीचा आकडा पूर्ण करते, याकडे आयुक्तांसह महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून आहे. ही आकडेवारी वाढावी म्हणून महापालिकेच्यावतीने विशेष मोहीम सुरू केली गेली आहे. मालमत्ता थकबाकीदारांना शास्ती माफ करण्यात आली असून, सुटीच्या दिवशीदेखील महापालिकेचा कर भरणा कक्ष नियमित सुरू ठेवण्यात आला आहे.
महापालिकेला मागील आणि चालू असे एकूण १०३७७२५३०५ रुपये घेणे होते. यापैकी ३७०१५८४६४ रुपयांची वसुली महापालिकेच्या कर वसुली विभागाने केली आहे. आता महापालिकेला मार्च अखेरपर्यंत ६६७५६६८४१ ही रक्कम गोळा करायची आहे. या आकडेवारीनुसार केवळ ३५.६७ टक्के वसुली करण्यात कर विभागाला यश आले आहे. अकोला महापालिकेच्या चार झोननिहाय आकडेवारीनुसार हिशेब लावल्यास अकोला पूर्वची वसुली टक्केवारी सर्वात जास्त आहे. पूर्व झोनने ५१.४७ टक्के थकीत मालमत्ता कर वसूल केला आहे. त्यापाठोपाठ दक्षिण झोनचा क्रमांक लागतो. येथे ३४.६३ टक्के कर वसुली झाली आहे. पश्चिम झोनची वसुली केवळ २७.०३ टक्के असून, उत्तर झोनची वसुली २६.६३ टक्के एवढी आहे. मार्च महिन्यातील उर्वरित दिवसांत मनपा कर विभाग आणखी पाच टक्के वसुलीचा आकडा फुगवू शकणार आहे. तरीदेखील ६० टक्के थकबाकी अकोलेकरांवर कायम राहते.
३१ मार्चपर्यंत शास्ती माफ
ज्या अकोलेकरांकडे मागील मालमत्ता कर थकीत आहे, त्यांना ३१ मार्चच्या विशेष वसुली मोहिमेदरम्यान शास्ती माफ करण्यात आले आहे. शास्तीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी अकोलेकरांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेच्या आवाहनात्मक सादला अकोलेकर किती प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.