३६ हजार नवतरुण मतदार बजावणार मतदानाचा हक्क!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 04:24 PM2019-09-25T16:24:04+5:302019-09-25T16:24:09+5:30
१८ ते १९ वर्षे वयोगटातील ३६ हजार २८८ नवतरुण मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
अकोला: विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाच मतदारसंघात १५ लाख ७७ हजार २५४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यामध्ये १८ ते १९ वर्षे वयोगटातील ३६ हजार २८८ नवतरुण मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
अकोला जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर याच विधानसभा मतदारसंघात ३१ आॅगस्ट २०१९ अखेरपर्यंत एकूण १५ लाख ७७ हजार २५४ मतदारांची संख्या आहे. त्यामध्ये ८ लाख १२ हजार १८१ पुरुष व ७ लाख ६१ हजार ८६४ महिला मतदार असून, ४६ इतर मतदार आणि ३,१६३ सेवा मतदार आहेत. जिल्ह्यातील मतदारांमध्ये १८ ते १९ वर्षे वयोगटातील ३६ हजार २८८ नवतरुण मतदारांचा समावेश आहे. विधासभा निवडणुकीसाठी घेण्यात येणाऱ्या मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील मतदारांसह नवतरुण मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
३० ते ३९ वयोगटातील सर्वाधिक मतदार!
जिल्ह्यात ३० ते ३९ वर्षे वयोगटातील मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजेच ३ लाख ६७ हजार २८४ आहे. तर २० ते २९ वर्षे वयोगटातील ३ लाख १६ हजार ३७० मतदार, ४० ते ४९ वर्षे वयोगटातील ३ लाख २९ हजार ५५९ मतदार, ५० ते ५९ वर्षे वयोगटातील २ लाख ४२ हजार १०३ मतदार, ६० ते ६९ वर्षे वयोगटातील १ लाख ४९ हजार ९०५ मतदार, ७० ते ७९ वर्षे वयोगटातील ८१ हजार ७७९ मतदार आणि ८० वर्षापेक्षा अधिक वयाचे ५० हजार ८०३ मतदार आहेत.
मतदार नोंदणी!
गत ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत नाव नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट आहेत. मतदार नोंदणी निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने, विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत मतदार मतदार यादीत नाव नोंदवून मतदानाचा हक्क बजावू शकतील.