३६ व्हेंटिलेटर मिळाले; पण कार्यान्वित नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 03:22 PM2020-07-07T15:22:17+5:302020-07-07T15:22:31+5:30

व्हेंटिलेटर येऊन २५ दिवस झाले, तरी अद्यापही व्हेंटिलेटर कार्यान्वित झाले नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

36 ventilators received; But are not operational | ३६ व्हेंटिलेटर मिळाले; पण कार्यान्वित नाहीत

३६ व्हेंटिलेटर मिळाले; पण कार्यान्वित नाहीत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्युदर झपाट्याने वाढत आहे. अशातच जून महिन्यात केंद्र सरकारकडून सर्वोपचार रुग्णालयाला ३६ व्हेंटिलेटर प्राप्त झाले होते. त्यामुळे मृत्युदर रोखण्यास काही प्रमाणात दिलासा मिळण्याच्या आशा वाढल्या होत्या; परंतु व्हेंटिलेटर येऊन २५ दिवस झाले, तरी अद्यापही व्हेंटिलेटर कार्यान्वित झाले नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
राज्यात कोरोनाने थैमान घातले असून, काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या अन् मृत्यूचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. या परिस्थितीवर नियंत्रणासाठी राज्याप्रमाणेच केंद्र सरकारकडूनही विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहे. या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये व्हेंटिलेटर पाठविले. त्यात अकोल्याचाही समावेश असून, शनिवार २० जून रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाला तब्बल ३६ व्हेंटिलेटर प्राप्त झाले होते. कोरोनामुळे मृत्यूचा आकडा दररोज वाढत असताना सर्वोपचार रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांना व्हेंटिलेटरसाठी वेटिंगवर राहण्याची वेळ आली होती; परंतु आता व्हेंटिलेटर मिळाल्याने आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम होणार, अशी आशा रुग्णालय प्रशासनाला होती; परंतु व्हेंटिलेटर येऊन जवळपास २५ दिवसांचा कालावधी उलटून गेला, तरी व्हेंटिलेटर सुरू झाले नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. मुबलक व्हेंटिलेटर असूनही रुग्णांना व्हेंटिलेटरची प्रतीक्षा करावी लागत असून, गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.
डॉक्टरांनाही येताहेत अडचणी

कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. यामध्ये काही गंभीर रुग्णांचाही समावेश असून, त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासल्यास डॉक्टरांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्यास डॉक्टरांनाही रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचा रोष सहन करावा लागतो.

सर्वोपचार रुग्णालयात दाखल नवीन व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्यासाठी तंत्रज्ञ उपलब्ध नाही. त्यासाठी पाठपुरावा घेणे सुरू आहे. लवकरच व्हेंटिलेटर सुरू करण्यात येतील.
- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

 

Web Title: 36 ventilators received; But are not operational

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.