मुर्तीजापूर तालुक्यात ३७ शाळांच्या इमारती शिकस्त; मुंगशी येथे शाळेचे छत कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 05:33 PM2020-08-17T17:33:50+5:302020-08-17T17:34:03+5:30
मुंगशी येथील जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या इमारतीचे छत १४ आॅगस्ट रोजी रात्री कोसळल्याची घटना घडली.
- संजय उमक
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : शासन शैक्षणिक कार्यावर भर देत असताना विद्यार्थ्यांच्या मूलभूत सोयींकडे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील अनेक शाळांच्या इमारती शिकस्त झाल्या आहेत, तर नवीन बांधण्यात आलेल्या इमारतींचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तालुक्यातील ३७ शाळांच्या इमारती शिकस्त झाल्या असून, विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, तालुक्यातील मुंगशी येथील जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या इमारतीचे छत १४ आॅगस्ट रोजी रात्री कोसळल्याची घटना घडली.
तालुक्यात १४२ शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यापैकी ३७ शाळांतील ६७ खोल्या शिकस्त झाल्या असल्याने त्या जमीनदोस्त करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे; परंतु या खोल्यांना जमीनदोस्त करण्याची परवानगी मिळाली नाही. यापूर्वी १७ शाळांमधील ३२ खोल्यांच्या अंदाजपत्रकासाठी उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद यांच्याकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे. मुंगशी येथील जिल्हा परिषद शाळेची दोन खोल्यांची जुनी इमारत असून, अनेक वर्षांपासून शिकस्त झाली होती. या इमारतीचे छत १४ आॅगस्टच्या रात्री कोसळले. शाळेत १ ली ते ७ वी पर्यंत वर्ग भरतात. शाळेची पटसंख्या ५५ असून, सध्या कोरोनाच्या पृष्ठभूमीवर शाळा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थी उपस्थित नसल्याने मोठा अनर्थ टळला. शाळा इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती मुख्याध्यापक मनीष कट्यारमल यांनी दिली. याच शाळेपासून काही अंतरावर २०१० मध्ये २ लक्ष ७० रुपये व २०१४ मध्ये १० लक्ष २६ हजार खर्च करून नवीन शाळा इमारत उभारण्यात आली असून, या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या इमारतीला मोठे तडे गेले आहेत. तालुक्यातील ३७ शाळांमधील विद्यार्थ्यांना भविष्यात शिक्षण घेण्यासाठी इमारतच नसल्याने त्यांच्या शैक्षणिक मूलभूत सुविधा प्रश्न ऐरणीवर आला आहे.