३७ हजार वाहनचालकांनी ना वाहतुकीचा नियम पाळला, ना दंड भरला; ७१ लाख रुपये थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:17 AM2021-02-14T04:17:43+5:302021-02-14T04:17:43+5:30
७४ हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासोबतच नागरिकांचा जीव सुरक्षित राहावा ...
७४ हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासोबतच नागरिकांचा जीव सुरक्षित राहावा यासाठी शासनाने वाहतुकीचे नियम घालून दिलेले आहेत. असे असतानाही अनेक वाहनचालक नियमांची ऐशीतैसी करत आहेत. अशाच ७४ हजार १२८ वाहनचालकांवर शहर वाहतूक शाखेने २०२० मध्ये कारवाई केली. त्यातील ३६ हजार २५६ वाहनचालकांनी दंड भरला. मात्र, ३७ हजार ५६५ वाहनचालकांनी ना वाहतुकीचा नियम पाळला, ना दंड भरला. त्यांच्याकडे सुमारे ७१ लाख रुपयांचा दंड थकीत आहे.
रहदारीस अडथळा जाणवू नये यासाठी शहरातील विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, त्याठिकाणी कोणीच वाहने उभी करत नाहीत. यामुळे सदैव नागरिकांच्या गर्दीने गजबजणाऱ्या ठिकाणी रहदारी दिवसभरातून अनेक वेळा विस्कळीत होते. दंडात्मक कारवाईची तरतूद असतानाही अनेक वाहनांवर ट्रिपल सीट वाहतूक केली जात आहे. दुचाकी वाहन चालवत असताना मोबाइलवर बोलणे टाळावे, असे आवाहन वेळोवेळी केले जाते. मात्र, त्याकडे कानाडोळा करून अनेक जण आजही वाहन चालवत असताना मोबाइलवर संभाषण करताना दिसून येत आहेत. वेगमर्यादा ठरवून दिल्यानंतरही वाहने भरधाव चालविली जातात. अशाच स्वरूपातील नियम मोडल्याप्रकरणी शहर वाहतूक शाखेने २०२० या वर्षांत ७४ हजार १२८ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. या ७४ हजार १२८ वाहनचालकांकडून वाहतूक शाखेला सुमारे १ कोटी ५० लाख रुपये दंडाची रक्कम वसूल करणे अपेक्षित होते. मात्र, यामधील ३६ हजार २५६ वाहनचालकांनी दंड भरला असून, ही रक्कम ७१ लाख ९४ हजार ६०० रुपये एवढी आहे, तर ३७ हजार ५६५ वाहनचालकांनी ना वाहतुकीचा नियम पाळला, ना दंड भरला. त्यांच्याकडे सुमारे ७१ लाख रुपयांचा दंड थकीत आहे.
दंडात्मक कारवाई ७४ हजार १२८ वाहने
दंड वसूल ७१ लाख ९४ हजार
दंड थकीत ७१ लाख ६०० रुपये
...तर वाहन परवाना रद्द
शासनाने घालून दिलेल्या वाहतूक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. नियम तोडणाऱ्यांकडून ठरावीक दंड वसूल केला जातो. तो निर्धारित मुदतीत अदा न केल्यास वाहन परवाना रद्द करण्याची कारवाई होऊ शकते. याबाबत वेळोवेळी सांगूनही अनेक वाहनचालक नियमांना वाकुल्या दाखवत आहेत.
कोरोना काळात ४ महिने दंडाची रक्कम कोरोनाच्या धास्तीने स्वीकारली जात नव्हती म्हणून प्रलंबित राहिली, हा दंड वसूल करण्यासाठी वेळोवेळी मोहीम राबवून दंड वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, दंडात्मक कारवाई करूनही अनेक जण नियम पाळत नाहीत किंवा दंड भरत नाहीत.
-गजानन शेळके, वाहतूक शाखाप्रमुख, अकोला
मागील दीड वर्षापासून दंडात्मक कारवाई ही ई- चालान मशीनद्वारे होत आहे. ज्यामध्ये दंड भरण्यास पैसे नसतील, तर अनपेड ही सुविधा आहे. त्यामुळे दंड न भरणाऱ्यांची संख्या वाढत आहे; परंतु एकदा दंडात्मक कारवाई झाली, तर दंड कुठे ना कुठे किंवा कधी ना कधी भरावाच लागतो, चालान बाकी असलेल्या वाहनांची आवश्यक कागदपत्रे किंवा वाहन चालविण्याचा परवाना नूतनीकरण करताना दंड भरला की नाही, ते पाहिले जाते किंवा दंड प्रलंबित असला, तर परवाना निलंबनसुद्धा होऊ शकते.