३८१ पॉस मशीनची गरज, मिळाल्या फक्त १00!
By admin | Published: July 7, 2017 01:47 AM2017-07-07T01:47:45+5:302017-07-07T01:47:45+5:30
रासायनिक खत विक्रीसाठी तेल्हाऱ्यात वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : रासायनिक खतांची आॅनलाइन विक्री १ जूनपासूनच करण्याचे ठरले असताना, जिल्ह्यात अद्यापही आवश्यकतेएवढ्या पॉस मशीनचा पुरवठा झालेला नाही. जिल्ह्यातील कृषी केंद्रांमध्ये आवश्यक असलेल्या ४३१ पैकी पहिल्या टप्प्यात ५०, त्यानंतर आता १०० मशीनचा पुरवठा बुधवारी करण्यात आला. आता मिळालेल्या सर्व मशीनचे वाटप तेल्हारा तालुक्यात देत हा संपूर्ण तालुका आॅनलाइन करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केला आहे.
खत खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डची आॅनलाइन पडताळणी होणार आहे, तसेच त्याच व्यक्तीने खत घेतल्याची नोंद म्हणून त्याचा अंगठाही घेतला जाणार आहे. खतांची विक्री आॅनलाइन करण्यासाठी जिल्ह्यातील कृषी केंद्रांमध्ये ४३१ पॉस (पॉइंट आॅफ सेल) मशीन आवश्यक आहेत. तरी संबंधित कंपनीने सुरुवातीला केवळ ५० मशीन उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर पॉस मशीनचा पुरवठा तातडीने करावा, यासाठी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे यांनी १७ मे आणि त्यानंतरही सातत्याने पुरवठादार कंपनीला पत्र पाठविले. त्यानंतरही आतापर्यंत पॉस मशीनचा पुरवठा झाला नव्हता. तब्बल दीड महिन्यानंतर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला १०० मशीन बुधवारी मिळाल्या. केंद्र शासनाने आधीच यादीनुसार अकोला जिल्ह्यात ४३१ कृषी सेवा केंद्रांमध्ये पॉस मशीन दिल्या जात आहेत. आधीच्या आणि आताच्या मिळून १५० मशीनचे वाटप कृषी विभागाकडून झाले आहे. मशीन पुरविणे, विक्रेत्यांना प्रशिक्षण देणे, आॅनलाइनसाठी समन्वय ठेवण्याची जबाबदारी पुरवठादार झुआरी डिलर्सची आहे. मात्र, आवश्यकतेएवढ्या पॉस मशीन उपलब्धच झालेल्या नाहीत. त्यामुळे या उपक्रमाची अंमलबजावणी सुरुवातीलाच रखडली आहे.