पहिली ते दहावीतील पटसंख्येत ३८३ ने घट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:43 AM2020-12-17T04:43:37+5:302020-12-17T04:43:37+5:30
कोरोनामुळे कामगार, मजूर हे आपापल्या गावी परतले. यापैकी काहींच्या पाल्यांनी त्यांच्या स्व-जिल्ह्यातच प्रवेश घेतले, तर जिल्ह्यातील काही पालकांनी आपल्या ...
कोरोनामुळे कामगार, मजूर हे आपापल्या गावी परतले. यापैकी काहींच्या पाल्यांनी त्यांच्या स्व-जिल्ह्यातच प्रवेश घेतले, तर जिल्ह्यातील काही पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश खासगी शाळेत घेतला; परंतु आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. बाहेरगावी, परप्रांतात गेलेले मजूर रोजगारासाठी जिल्ह्यात परत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये घटलेली विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. जिल्हा परिषद शाळेत पुरेशा प्रमाणात भौतिक सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे, तसेच नानाविध उपक्रम राबवून शैक्षणिक दर्जा उंचाविण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे काही शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्याला अजून बराच वाव आहे. गतवर्षीसुद्धा ४४० विद्यार्थ्यांची गळती झाली होती. कोरोनामुळे ही गळती वाढण्याची भीती निर्माण झाली होती; परंतु आता जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने आणि इयत्ता ९ ते १२ वीपर्यंतच्या वर्गांना परवानगी दिल्याने, शैक्षणिक कार्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गळती झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येची तूट भरून काढण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे.
प्रशासन व पालकांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांची गळती!
यंदा कोरोनामुळे मजूर व कामगार हे आपापल्या मूळ गावी परतले आहेत. यापैकी अनेकजण अकोला जिल्ह्यात परत आले नाहीत. त्यामुळे या पाल्यांचे प्रवेश रखडले आहेत. तसेच काही पालकांनी खासगी शाळांना पसंती दिल्याने पटसंख्येत घट आल्याचे दिसून आहे. मजूर, कामगार हे जिल्ह्यात परतल्यानंतर इयत्ता पहिली ते दहावीतील पटसंख्या पूर्ववत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोरोना संकट असून, आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. विद्यार्थी संख्येत यंदा ३८३ ने घट झाली असली तरी, ही घट भरून काढण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. पटसंख्या वाढविण्यासाठी विद्यार्थी शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.
डॉ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक