अकोला दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत जाहीर; एकनाथ शिंदेंनी दिले निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 11:35 AM2023-04-10T11:35:27+5:302023-04-10T11:35:53+5:30
अकोल्यातील घटनेबाबात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून त्यांनी शोक व्यक्त केला.
सोसाट्याचा वारा व अवकाळी पावसामुळे दीडशे वर्ष जुने कडुनिंबाचे झाड टिनपत्र्याच्या सभामंडपावर कोसळून सात भाविक ठार झाल्याची घटना अकोला जिल्ह्यातील पारस येथील बाबूजी महाराज संस्थानात रविवारी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत १ गंभीर तर ३० जण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, झाड कोसळल्यानंतर रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होते.
सदर घटनेबाबात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून त्यांनी शोक व्यक्त केला. मृतांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली असून जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. पारस येथील या दुर्घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाले आहेत. या घटनेची एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली.
पारस (जि.अकोला) येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली असून जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 10, 2023
बाबूजी महाराज संस्थानात दर रविवारी भाविक दर्शनासाठी येतात. या ठिकाणी रात्री १० वाजता 'दु:ख निवारण' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या तयारीत मंदिराच्या बाजूच्या सभामंडपात भाविक एकत्र आले होते. दरम्यान, सायंकाळी वातावरणात बदल होऊन सोसाट्याचा वारा सुटला. या वादळी वाऱ्यामुळे मंदिराच्या बाजूला असलेले कडुलिंबाचे झाड टिनपत्र्याच्या सभामंडपावर कोसळले. त्यामुळे सभामंडप व झाड अंगावर पडल्याने जवळपास ५० जण दबल्याची माहिती समोर येत असून, या घटनेत सात जण ठार झाल्याची माहिती ठाणेदारांनी दिली.
दरम्यान, सदर घटनेत ५ पुरुषांसह २ महिलांचा मृत्यू झाला असून, यामध्ये मुरलीधर अंबारखाने (रा. पारस), अतुल आसरे (वय ३५ बाभुळगाव), पार्वतीबाई सुशीर (वय ५५ रा. भालेगाव बाजार, ता. खामगाव), उमा खारोडे (वय ५० दीपनगर, भुसावळ) इतर तीन मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु होते. तसेच रात्री उशिरापर्यंत शोध व बचावकार्य सुरु होते. रात्री उशिरा विभागीय आयुक्त निधी पांडेय, आयजी जयंत नाईकनवरे यांनी सर्वोपचारमध्ये जखमींची विचारपूस केली.
टिनपत्रे, सौर पॅनल उडाले !
वादळी वाचामुळे पारस येथे अनेक घरांवरील टिनपत्रांसह सौर ऊर्जेचे पॅनल उडाले. त्यापाठोपाठ अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने घरातील साहित्य भिजले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.