अकोल्यातील ४ अधिकाऱ्यांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:20 AM2021-02-24T04:20:28+5:302021-02-24T04:20:28+5:30
शुभांगी दिवेकर कोरडे, वैशाली आढाव या दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश अकोला : पोलीस महासंचालक कार्यालयाने जाहीर केलेल्या नि:शस्त्र सहाय्यक ...
शुभांगी दिवेकर कोरडे, वैशाली आढाव या दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश
अकोला : पोलीस महासंचालक कार्यालयाने जाहीर केलेल्या नि:शस्त्र सहाय्यक पोलीस निरीक्षक ते नि:शस्त्र पोलीस निरीक्षक पदोन्नतीच्या यादीमध्ये अकोल्यातील ४ अधिकाऱ्यांचा समावेश असून यामध्ये दोन महिला अधिकारीसुद्धा आहेत.
पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील नि:शस्त्र सहाय्यक पोलीस निरीक्षकांची सेवाज्येष्ठतेप्रमाणे माहिती मागवून त्यातील ४३८ अधिकाऱ्यांना पोलीस निरीक्षकपदी बढती दिली आहे. त्यामध्ये अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्र येथील शुभांगी मुकुंद कोरडे-दिवेकर, राज्य गुप्तवार्ता येथील वैशाली आढाव तर अकोला पोलीस अधीक्षक कार्यालय आस्थापनेवरील संग्रामसिंग पाटील, गजाननसिंग बायसठाकूर या ४ अधिकाऱ्यांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे. पदोन्नतीवर शुभांगी कोरडे-दिवेकर यांची पोलीस प्रशिक्षण येथून जिल्हा जातपडताळणी समिती अकोला, वैशाली आढाव यांची राज्य गुप्तवार्ता येथून पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई, संग्रामसिंग पाटील व गजाननसिंग बायसठाकूर यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे तसेच पदोन्नतीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हिंगोली येथून नरेंद्र देशमुख यांची अकोला येथे बदली करण्यात आली आहे.