कोरोना रुग्ण आढळताच, अकोला जिल्ह्यात ४ शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 11:19 AM2021-08-01T11:19:20+5:302021-08-01T11:19:25+5:30

4 schools closed in Akola district : हातरूण येथे शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर येथील दोन व जिल्ह्यातील इतर दोन शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

4 schools closed in Akola district after teacher found corona positve |  कोरोना रुग्ण आढळताच, अकोला जिल्ह्यात ४ शाळा बंद

 कोरोना रुग्ण आढळताच, अकोला जिल्ह्यात ४ शाळा बंद

Next

अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ओसरत असला, तरी कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत. बाळापूर तालुक्यातील हातरूण येथे शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर येथील दोन व जिल्ह्यातील इतर दोन शाळा बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे शिक्षण विभागाने २६ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली होती. शाळा सुरू झाल्यानंतर पालकांनीही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले; परंतु विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याचे प्रमाण केवळ ३० टक्के आहे. १ लाख ३७ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ ४० हजार ८८४ विद्यार्थ्यांची शाळांमध्ये उपस्थिती असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाने सांगितले. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत सहमती दर्शविली असली, तरी पालकांना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी वाटत असल्याने, अनेकांनी मुलांना शाळेत पाठविण्यापेक्षा घरी बसूनच ऑनलाइन शिक्षण घेण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. तसेच जिल्ह्यातील चार शाळांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे या शाळा तूर्तास बंद करण्यात आल्या आहेत.

दहा दिवसांत ४ शाळा बंद!

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील आठवी ते बारावीच्या ५४९ शाळांपैकी ४१९ शाळा सुरू करण्यास परवानगी दिली; परंतु काही दिवसांमध्येच काही शिक्षकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे या शाळा बंद करण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे ३५० विद्यार्थ्यांना आता पुन्हा ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागणार आहे. तसेच तिसऱ्या लाटेची संभावना पाहता, पालकांमध्ये भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास नकार देत आहेत.

जिल्ह्यात एकूण शाळा - ५४९

सध्या सुरू असलेल्या शाळा- ४१५

शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती- ४०,८८५

विद्यार्थी मजेत, पालक चिंतेत

आम्ही दररोज शाळेत जात आहोत. कोरोनाचा प्रभाव आता कमी झाला आहे. घरी ऑनलाइन शिक्षण घेण्याचा कंटाळा आला आहे. दीड वर्षापासून मित्रांपासून दूर आहोत; परंतु शाळा सुरू झाल्यामुळे आनंदित आहोत.

-वैभव राजगुरे, आठवीचा विद्यार्थी

दीड वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा कंटाळा आला होता. आता शाळा सुरू झाल्यामुळे नियमित शाळेत जात आहे. कोरोनाची भीती असल्यामुळे पालक व शाळेकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

-स्वानंदी आठवले, नववीची विद्यार्थिनी

 

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे शाळा सुरू झाल्या; परंतु तिसरी लाट येण्याची भीती आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याविषयी काळजी वाटते. सध्या तरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी दिसत असल्यामुळे मुलांना शाळेत पाठवीत आहे; परंतु मुलांविषयी चिंता वाटते.

-राजेश बोनगीरवार, पालक

Web Title: 4 schools closed in Akola district after teacher found corona positve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.