४ हजार नागरिकांनी केले सूर्याला नमन
By Admin | Published: January 22, 2015 01:55 AM2015-01-22T01:55:18+5:302015-01-22T01:55:18+5:30
सूर्यनमस्कार सर्वांगसुंदर व्यायाम; ४ हजारांच्या वर अकोलेकरांनी सहभाग नोंदविला.
अकोला: प्राचीन ऋषिमुनींनी जगाला दिलेली देणगी म्हणजे योगा. या योगाचाच एक भाग म्हणजे सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कारामुळे सर्वांगसुंदर व्यायाम होतो. विद्यार्थ्यांमध्ये या व्यायामाची आवड निर्माण व्हावी, तसेच भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे, हा उद्देश समोर ठेवून जिल्हा क्रीडा परिषद, अकोला जिल्हा योग परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला क्रीडा भारती, अकोला शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त सामूहिक सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन वसंत देसाई क्रीडांगण येथे बुधवारी केले होते. या कार्यक्रमात ४ हजारांच्या वर अकोलेकरांनी सहभाग नोंदविला. सकाळीच ७.३0 वाजता ढगाळ वातावरणात सूर्याने किंचित डोकावले होते. अशा परिस्थितीत अजिंक्य फिटनेस पार्कच्या सदस्यांनी मैदानात सर्व उपस्थितांसह १२ सूर्यनमस्काराचे मंत्रोच्चारासह प्रात्यक्षिक केले. यापाठोपाठ योग शास्त्रातील ३१ क्रमांकाच्या सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक बालशिवाजी शाळा, भारत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अजिंक्य फिटनेस पार्कच्या सदस्यांसोबत केले. यामध्ये अर्धचक्रासन, पादहस्तासन, एकपाद प्रसरासन, हनुमान आसन स्थिती, त्रिकोणासन, परवृत्त त्रिकोणासन, वक्रासन, द्विपाद प्रसरासन, योगमुद्रा, अष्टांग, पूर्ण नमस्कार, नौकासन, भुजंगासन, तिरक त आसन, पर्वतासन या आसनांचा समावेश होता. मंचावर प्रात्यक्षिकासाठी माजी प्राचार्य विमल भालेराव, लतिका खडसे यांचा समावेश होता. त्यांना प्रभा काकड, माया भुईभार, पूजा जंगम, विशाल पेटकर, पुनम ठक्कर, शारदा डोंगरे यांनी सहकार्य केले. सूर्यनमस्काराचे संचालन धनंजय भगत यांनी केले. *३६२0 विद्यार्थ्यांचा सहभाग या कार्यक्रमात २१00 विद्यार्थी, ९७0 विद्यार्थिनी व ५५0 पोलीस प्रशिक्षणार्थींंचा सहभाग होता. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.