४0 लाखांच्या गुटख्याचा मालक सापडेना!
By admin | Published: June 4, 2016 02:23 AM2016-06-04T02:23:04+5:302016-06-04T02:23:04+5:30
कारवाईनंतर तीन दिवसांचा कालावधी उलटला!
अकोला: महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळाच्या फेज क्रमांक ४ मधील एका गोदामातून जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या पथकाने जप्त केलेल्या ४0 लाखांच्या गुटखा साठय़ाचा मालक कारवाईच्या तीन दिवसांनंतरही सापडलेला नाही. गोदामाचे मालक पंकज राऊत आहेत; मात्र त्यांनी हे गोदाम कुणाला भाड्याने दिले होते आणि त्यामध्ये गुटख्याचा साठा कुणी ठेवला, याचा शोध घेण्यास पोलीस व अन्न आणि औषध प्रशासन विभागाला वेळ मिळत नसल्याने चित्र असून, या प्रकरणात त्यांची भूमीका संशयास्पद असल्याची चर्चा आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फेज क्रमांक ४ मध्ये पंकज राऊत नामक इसमाचे गोदाम असून या गोदामातून जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सचिन जाधव यांच्या पथकाने या बंद गोदामावर छापा टाकून सुमारे ४0 लाख रुपयांचा प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त केला आहे. मंगळवारी पंकज राऊतच्या गोदामातील गुटखा साठा जप्त केला; मात्र शुक्रवारपर्यंतही पोलिसांनी हा गुटखा कुणाच्या मालकीचा आहे, याचा शोध घेतलेला नाही. एरव्ही किरकोळ कारणावरून मोठी कारवाई असल्याचे भासविणार्या पोलिसांना ४0 लाख रुपयांचा गुटखा साठा कुणाचा आहे, याचा शोध घेण्यात रस नसल्याचे दिसून येत आहे. गुटखा माफियांक डून पोलिसांना मोठय़ा प्रमाणात हप्ता पोहोचविण्यात येत असल्याने खाल्ल्या मिठाला जागत पोलीस दलातील काही अधिकारी व कर्मचारी गुटखा माफियांची पाठराखण करीत असल्याचे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पंकज राऊतची कसून चौकशी केल्यास काही वेळताच गुटखा साठय़ाचा खरा मालक समोर येणार असल्याचे बोलल्या जात आहे; मात्र या गुटखा मालकाला पोलीस, अन्न व औषध प्रशासनातीलच काही अधिकारी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. एमआयडीसी पोलिसांच्या नाकाखाली एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गुटख्याची उलाढाल सुरू असताना पोलीस काय करीत आहे, असा सवाल विशेष पथकाच्या कारवाईनंतर समोर आला आहे.