दूषित पाणी पिल्याने ४0 जण आजारी
By admin | Published: March 24, 2017 02:19 AM2017-03-24T02:19:01+5:302017-03-24T02:19:01+5:30
बोरगाव वैराळे येथील घटना
बोरगाव वैराळे(जि. अकोला), दि. २३- बोरगाव वैराळे गावाला पाणीपुरवठा करणारी कूपनलिका ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे मागील एक महिन्यापासून बंद पडल्याने, ग्रामस्थांना पिण्यासाठी एकतर पूर्णा नदीचे दूषित पाणी किंवा ग्रामपंचायतने तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेल्या कूपनलिकेचे खारे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. गावातील ३0 ते ४0 टक्के लोकांना हगवण आणि उलटीच्या आजाराने ग्रासले आहे.
बोरगाव वैराळेची लोकसंख्या दोन हजार असून, या गावात सन २000 पासून स्वतंत्र पाणीपुरवठा दुधाळा शेतशिवारातील कूपनलिकेवरून होत होता. यावर्षी भरपूर पावसाळा होऊनदेखील ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे एक महिन्यापासून गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, गोरगरिबांना पूर्णा नदीचे दूषित पाणी किंवा ग्रामपंचायतने तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेल्या गावातील काळे कूपनलिकेचे खारे पाणी पिण्यासाठी वापरण्याची वेळ आली. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल हातरुण प्राथमिक आरोग्य केंद्राने पंधरा दिवसांपूर्वी स्थानिक ग्रामपंचायत आणि गटविकास अधिकारी बाळापूर यांना सादर केला असून, तत्काळ हे पाणी पिण्यासाठी वापरणे बंद करण्यात यावे, अशी सूचनादेखील सदर पत्रात केली आहे; मात्र सदर पत्राची कुठलीही दखल ग्रामपंचायत व पंचायत समिती बाळापूर यांच्याकडून घेण्यात आली नाही.
त्यामुळे बोरगाव वैराळे गावात ग्रामस्थ सर्रास हेच दूषित पाणी पिण्यासाठी वापरत असल्याने गावातील ३0 ते ४0 टक्के लोकांना हगवण आणि उलटीचा त्रास सुरू झाल्याने हे ग्रामस्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात इलाज करण्यासाठी जात आहेत.
दिवसेंदिवस रुग्णांची प्राथमिक आरोग्य केंद्रात संख्या वाढत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. बी. इंगळे यांनी दोन दिवसांपूर्वी स्थानिक ग्रामपंचायत आणि पंचायत समिती बाळापूर यांना बोरगाव वैराळे गावातील दूषित पाणीपुरवठा बंद होण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी दुसर्यांदा स्मरणपत्र दिले आहे.
अद्याप बोरगाव वैराळे गावातील पाणीपुरवठा जुन्या कूपनलिकेवरून करण्यासाठी ग्रामपंचायतने कुठल्याही प्रकारच्या हालचाली सुरू केल्या नाहीत.