अकोला जिल्हय़ात ४0 टक्केच शाळा प्रगत!

By admin | Published: March 11, 2017 02:18 AM2017-03-11T02:18:29+5:302017-03-11T02:18:29+5:30

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम कासवगतीने; अकोला जिल्ह्यातील ३४४ शाळा झाल्या प्रगत.

40 percent of schools in Akola district have advanced! | अकोला जिल्हय़ात ४0 टक्केच शाळा प्रगत!

अकोला जिल्हय़ात ४0 टक्केच शाळा प्रगत!

Next

अकोला, दि. १0- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक शाळा डिजिटल आणि ई-लर्निंग करण्यावर भर देण्यात येत आहे. या माध्यमातून शाळा आणि विद्यार्थ्यांची प्रगती उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात अनेक जिल्हय़ामध्ये प्राथमिक शाळांच्या गुणवत्तेचा स्तर उंचावत असताना, अकोला जिल्हय़ात मात्र शाळांच्या प्रगतीची गती थांबली असल्याचे प्राप्त आकडेवरून दिसून येत आहे. जिल्हय़ात आतापर्यंत केवळ ४0 टक्केच शाळा शंभर टक्के प्रगत झाल्या आहेत.
शासनाने २२ जून २0१५ पासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत प्राथमिक शाळेत जाणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याने वयोगटानुसार अपेक्षित क्षमता प्राप्त करणे, त्याच्या शैक्षणिक प्रगतीची चाचण्यांच्या माध्यमातून मूल्यमापन करणे, भाषा व गणित विषयातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न केल्या जातात, तसेच शाळा डिजिटल करून प्रत्येक चार विद्यार्थ्यांमागे एक टॅब्लेट देऊन त्यांना स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील इतर जिल्हय़ांमधील ७0 ते ८0 टक्के शाळा प्रगत झाल्या आहेत. या जिल्हय़ांच्या तुलनेत अकोला जिल्हय़ात धीम्या गतीने शाळांची प्रगती होत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमास शहरातील शाळांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, ग्रामीण भागात त्याउलट परिस्थिती दिसून येत आहे. ग्रामीण भागामध्ये शाळा प्रगत करण्याकडे शिक्षकांचे दुर्लक्ष होत असल्याचे प्राप्त आकडेवरून स्पष्ट होत आहे. जिल्हय़ात एकूण ९१२ प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी अध्र्याही शाळा प्रगत झाल्या नसल्याची वस्तुस्थिती आहे. जिल्हय़ात आतापर्यंत ३४४ शाळाच प्रगत झाल्या आहेत. शिक्षण विभागाने जिल्हय़ातील अधिकाधिक शाळा प्रगत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत; परंतु शिक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे जिल्हय़ातील प्राथमिक शाळांच्या प्रगतीचा टक्का घसरला आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. या कारणांचा शोध घेऊन शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविण्यात येणार्‍या अडचणी आणि शिक्षकांना येणार्‍या समस्या, सोयी-सुविधा याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे.

तालुकानिहाय प्रगत शाळा
अकोला-           १३८
अकोट-              ११
बाळापूर-            ४0
बाश्रीटाकळी-      ३४
पातूर-                २४
मूर्तिजापूर-         ५६
तेल्हारा-              ४१
............
एकूण -             ३४४



जिल्हय़ात धिम्या गतीने शाळांची प्रगती होत आहे, असे म्हणता येणार नाही. ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांंची प्रगती होत आहे. त्यामुळेच आतापर्यंत ४0 टक्के शाळा प्रगत झाल्या आहेत. शाळा प्रगत कशा होतील, त्याची टक्केवारी कशी वाढेल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी
प्राथमिक विभाग जिल्हा परिषद

Web Title: 40 percent of schools in Akola district have advanced!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.