घरगुुती ग्राहकांना रुफटॉप यंत्रणेसाठी ४० टक्के अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:40 AM2021-09-02T04:40:44+5:302021-09-02T04:40:44+5:30
केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या रुफटॉप सौर योजना टप्पा दोन अंतर्गत महावितरणसाठी २५ मेगावॅटचे उद्दिष्ट मंजूर झाले ...
केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या रुफटॉप सौर योजना टप्पा दोन अंतर्गत महावितरणसाठी २५ मेगावॅटचे उद्दिष्ट मंजूर झाले आहे. या योजनेमधून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून वित्त सहाय्य देण्यात येणार आहे. यात घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना २० टक्के अनुदान मिळणार आहे.
महावितरणने रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा आस्थापित करण्यासाठी परिमंडलनिहाय एजंन्सीजची नियुक्ती केली आहे. त्या पाच वर्षांच्या देखभाल खर्चासह रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेसाठी १ किलोवॅट - ४६,८२०, १ ते २ किलोवॅट - ४२,४७०, २ ते ३ किलोवॅट - ४१,३८०, ३ ते १० किलोवॅट - ४०,२९० तसेच १० ते १०० किलोवॅटसाठी ३७,०२० रुपये प्रति किलोवॅट किंमत जाहीर करण्यात आली आहे. या दराप्रमाणे ३ किलोवॅट क्षमतेसाठी सौर ऊर्जा यंत्रणेची १ लाख २४ हजार १४० रुपये किंमत राहील. त्यामध्ये ४० टक्के अनुदानाप्रमाणे ४९ हजार ६५६ रुपयांचे केंद्रीय वित्त सहाय्य मिळेल व संबंधित ग्राहकास प्रत्यक्षात ७४ हजार ४८४ रुपयांचा खर्च करावा लागेल.
शिल्लक वीज महावितरण घेणार
रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर दरमहा १०० युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलोवॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीज बिलामध्ये सध्याच्या वीजदरानुसार दरमहा सुमारे ५५० रुपयांची बचत होऊ शकेल. तसेच या यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेटमीटरिंगद्वारे वर्षअखेर शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जाईल. त्याचाही आर्थिक फायदा संबंधित घरगुती ग्राहकांना होणार आहे. सोबतच सौर यंत्रणा उभारणीच्या खर्चाची साधारणतः ३ ते ५ वर्षात परतफेड होणार आहे.