एटीएममधून परस्पर काढले ४० हजार रुपये!
By Admin | Published: June 9, 2017 03:58 AM2017-06-09T03:58:56+5:302017-06-09T03:58:56+5:30
खदान पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बँकेतून बोलत असल्याचे, सांगत एटीएम क्रमांक आणि पिन कोड क्रमांक मागून एटीएममधून परस्पर ४0 हजार रुपयांची रोख काढून घेतल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आला. याप्रकरणी खदान पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
खदान परिसरात राहणारे अनिल पुरोहित यांना तोतया बँक अधिकाऱ्याचा कॉल आला. तुमचे एटीएम कार्डची मुदत संपली आहे. त्याला अॅक्टिवेट करण्यासाठी तुमच्या एटीएमचा क्रमांक व पिन कोड देण्यास सांगितले. पुरोहित यांनी तोतया बँक अधिकाऱ्यावर विश्वास ठेवून त्याला एटीएमचा क्रमांक आणि पिन कोड सांगितला. काही वेळाने त्यांच्या बँक खात्यातील ४० हजार रुपये काढल्याचा संदेश त्यांच्या मोबाइलवर आला. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खदान पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. बँकेतून बँक अधिकाऱ्याचाच फोन असल्याचा पुरोहित यांना विश्वास आल्यामुळे त्यांनी एटीएम क्रमांक व पिन कोड सांगितला. त्यानंतर यांनी काही जणांकडे चौकशी केली असता, त्यांनी तुमची फसवणूक केल्याचे सांगितले. लगेच पुरोहित यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या खात्यातून ४० हजार रुपये अज्ञात व्यक्तीने काढल्याचे दिसून आले.