होलसेल किराणा बाजारातील ४0 व्यापार्यांना ६0 लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 02:08 AM2017-10-13T02:08:02+5:302017-10-13T02:11:03+5:30
दर्यापुरातील बनोसा येथील एका व्यापार्याने अकोला होलसेल किराणा बाजारातील ४0 व्यापार्यांना तब्बल ६0 लाखांनी गंडा दिल्याचा प्रकार उजेडात आला आहे. लक्ष्मी ट्रेडर्सच्या नावे या व्यापार्याने दिलेले धनादेश वटविल्या जात नसल्याने होलसेल मार्केटमधील व्यापार्यांची दिवाळी काळी होत आहे.
संजय खांडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : दर्यापुरातील बनोसा येथील एका व्यापार्याने अकोला होलसेल किराणा बाजारातील ४0 व्यापार्यांना तब्बल ६0 लाखांनी गंडा दिल्याचा प्रकार उजेडात आला आहे. लक्ष्मी ट्रेडर्सच्या नावे या व्यापार्याने दिलेले धनादेश वटविल्या जात नसल्याने होलसेल मार्केटमधील व्यापार्यांची दिवाळी काळी होत आहे.
दर्यापूर बनोसा येथील एका व्यापार्याने अकोला होलसेल बाजारातून दोन वर्षांंंत अनेक व्यवहार करून व्यापार्यांचा विश्वास संपादित केला. खदान परिसरात असलेल्या मुल्लानी चौकातील एका दलालाच्या माध्यमातून हा व्यापारी व्यवहार करीत होता मागील ऑगस्ट महिन्यात या व्यापार्याने दलालाच्या माध्यमातून तांदूळ, गहू, ज्वारी, सुपारी, साबुदाणा, शेंगदाणे, बेसन, मूग, तूर, चना, उडीद दाळींची खरेदी केली. या व्यवहारापोटी त्याने होलसेल किराणा बाजारातील ४0 व्यापार्यांना जवळपास ४0 लाखांचे लक्ष्मी ट्रेडर्सचे धनादेश दिलेत. २0 लाखांचा माल क्रेडिटवर उचलला. ऑगस्टमध्ये झालेल्या या व्यवहारापोटी दिलेले लक्षावधीचे धनादेश वटविल्या न गेल्याने आणि नगदची रक्कमही अचानक थांबविल्या गेल्याने अकोल्यातील व्यापार्यांना फसगत झाल्याचे समोर आले.
होलसेल किराणा बाजारातील ४0 व्यापार्यांनी एकत्रित येऊन या ठगाचा शोध आता सुरू केला आहे. विशेष म्हणजे अकोल्यातील व्यापार्यांना ठगवून बनोसा येथे या ठग व्यापार्याने किराणा दुकान थाटल्याचे समजते.
बनोसाचा व्यापारी अनेकांना ‘चावला’
दर्यापूरच्या बनोसा येथील हा ठग व्यापारी पोलिसांच्या रेकॉर्डवर हिस्ट्रीशीटर असल्याचे समोर येत आहे. याआधी या व्यापार्याने इलेक्ट्रिकचे दुकान टाकून अनेकांना चुना लावला. त्यानंतर सिमेंट व्यापारात गंडा घातला. आता किराणा बाजारातील व्यापार्यांना लुटले आहे. त्याच्यावर धनादेश अनादरचे अनेक न्यायालयीन खटले सुरू असल्याची माहिती व्यापार्यांना मिळाली आहे. या सर्व प्रकारावरून हा ठग व्यापारी अनेकांना ‘चावला’ असल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रकरण पोलिसांच्या कानावर
अकोल्यातील होलसेल किराणा बाजारातील व्यापार्यांना लक्षावधीने गंडविल्या गेल्याची बाब जुने शहर पोलिसांच्या कानावर गेली आहे. याप्रकरणी सामूहिक तक्रार करण्याच्या सूचनाही पोलिसांनी व्यापार्यांना केल्या आहे. सामूहिक लेखी तक्रार नोंदविण्याची तयारी होताच याप्रकरणी गुन्हा नोंदविल्या जाणार असल्याचे संकेत आहेत.
अकोल्यातही होते वास्तव्य
खदानच्या स्मशानभूमीच्या घाटाजवळ काही दिवस हा व्यापारी वास्तव्यास होता. त्यामुळे दलालीचा व्यवसाय करीत असलेल्या एका सोबत त्याचे संबंध जुळले. या ठग व्यापार्याने काही सहकार्यांच्या मदतीने अकोलाच्या कॉटन मार्केटमधील बाजारपेठेतच कमी दरात हा माल विक्री केल्याचेही बोलले जात आहे.
-