अकोला जीएमसीत मनुष्यबळाअभावी ४० व्हेंटिलेटर पडून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 10:38 AM2021-04-22T10:38:10+5:302021-04-22T10:38:16+5:30
Ventilators in Akola GMC : केवळ ३० व्हेंटिलेटर ॲक्टिव्ह असून, उर्वरित ४० व्हेंटिलेटर पडून असल्याची धक्कादायक माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
- प्रवीण खेते
अकोला : कोविडच्या गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वोपचार रुग्णालयावरील ताण वाढला आहे. क्षमता असूनही केवळ मनुष्यबळाअभावी सर्वोपचार रुग्णालयातील केवळ ३० व्हेंटिलेटर ॲक्टिव्ह असून, उर्वरित ४० व्हेंटिलेटर पडून असल्याची धक्कादायक माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. रुग्णालयाबाहेर मात्र रुग्णांची ऑक्सिजन बेड अन् व्हेंटिलेटरसाठी फरपट सुरू असल्याचे चित्र आहे. ही विदारक स्थिती पाहून येथील डॉक्टरही व्यवस्थेपुढे हतबल दिसून येत आहेत. नागपूरनंतर विदर्भातील मोठे आयसीयू युनिट अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित सर्वोपचार रुग्णालयातील आहे. त्यामुळे या ठिकाणी जिल्ह्यातील खासगी रुग्णालयासह बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, नागपूर येथील रुग्ण ऑक्सिजन बेड अन् व्हेंटिलेटरच्या शोधात येत आहेत. कोविडच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या वाढल्याने अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयावरील रुग्णसेवेचा ताण वाढला आहे. त्या तुलनेत उपलब्ध मनुष्यबळ अपुरे ठरत आहे. कोविडच्या पहिल्या लाटेत अकोला जीएमसीला केंद्र शासनातर्फे पीएम केअर फंडातून सुमारे ७० व्हेंटिलेटर प्राप्त झाले होते. त्यातील बहुतांश व्हेंटिलेटर अद्यापही स्टॉकमध्येच पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्वोपचार रुग्णालयातील परिस्थिती गंभीर होत चाचली असून, या ठिकाणी मनुष्यबळाअभावी सद्य:स्थितीत केवळ ३० व्हेंटिलेटर कार्यान्वित केले जाऊ शकत आहेत. शिवाय, ऑक्सिजन खाटाही अपुऱ्या पडत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे.
आयसीयू ५० टक्के कर्मचाऱ्यांवर
आयसीयूमध्ये तीन शिफ्टमध्ये डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात येते. त्यानुसार आयसीयूमध्ये दिवसाला १८ डॉक्टर, १८ परिचारिका, १८ अटेंडन्स आणि १५ स्विपरची आवश्यकता आहे, मात्र सद्य:स्थितीत आयसीयूमध्ये दिवसाला केवळ ९ डॉक्टर, ६ परिचारिका, ६ अटेंडन्स आणि ६ स्वीपर सेवा देत आहेत. गरजेच्या तुलनेत उपलब्ध मनुष्यबळ ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे.
जीएमसी केवळ राजकीय स्टंटबाजीचा आखाडा
कोविडच्या गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वोपचार रुग्णालयावरील ताण वाढला आहे. अत्यावश्यक सुविधा उपलब्ध असूनही मनुष्यबळाअभावी त्याचा वापर करणे शक्य नाही. अशा परिस्थितीतही येथील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी जिवाची बाजी लावत आहेत. अशा परिस्थितीतही हल्ली सर्वोपचार रुग्णालय केवळ राजकीय स्टंटबाजीचा आखाडा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, येथील मनुष्यबळ वाढणार कसे याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
सुपर स्पेशालिटीचा पर्याय, मनुष्यबळाचे काय?
सध्या जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधी सुपर स्पेशालिटीचा पर्याय निवडण्याच्या विचारात आहेत. या ठिकाणी अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्याचेही सल्ले दिले जात आहेत. मात्र, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणणार कुठून, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे उपलब्ध मनुष्यबळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सर्वोपचार रुग्णालयाचा डोलारा सांभाळणे कठीण झाले आहे, अशा परिस्थितीत सुपर स्पेशालिटीचा भार सांभाळणे जीएमसीला शक्य नसल्याचेही वास्तव आहे.