मानव विकास योजनेंतर्गत ४0६ विद्यार्थिनींना मिळणार सायकली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 01:22 PM2018-11-09T13:22:00+5:302018-11-09T13:22:07+5:30
अकोला: मानव विकास मिशन अंतर्गत पातूर तालुक्यातील ३२ शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींना मोफत सायकल देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १४ लाख २१ हजार रुपयांचे अनुदान जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन विभागाने मंजूर केले.
अकोला: मानव विकास मिशन अंतर्गत पातूर तालुक्यातील ३२ शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींना मोफत सायकल देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १४ लाख २१ हजार रुपयांचे अनुदान जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन विभागाने मंजूर केले. ४0६ विद्यार्थिनींना सायकली देण्यात येणार आहे. त्यासाठी आरटीजीएसनुसार मुख्याध्यापकांच्या बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे.
राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या तालुक्यांसाठी मानव विकास योजना कार्यक्रम राबविण्यात येतो. अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्यातील ३२ शाळांची योजनेसाठी निवड झाली आहे. ही योजना राबविण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी अनुदान उपलब्ध करून दिले आहे. २0१८ व १९ या वर्षासाठी शासनाकडून पातूर तालुक्यातील इयत्ता आठवी ते बारावीत शिकणाऱ्या ४९६ विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन मिळावे आणि घरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या शाळेमध्ये जाता यावे, यासाठी मोफत सायकली उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे. त्यासाठी प्रशासनाने माध्यमिक शिक्षण विभागाला १४ लाख रुपयांचा निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आहे. नियोजन विभागाने ४0६ सायकलींसाठीचे अनुदान माध्यमिक शिक्षण विभागाकडे दिले असून, हे अनुदान आरटीजीएसनुसार मुख्याध्यापकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. मुख्याध्यापकांनी प्रत्येकी ३,५00 रुपयांच्या किमतीची सायकल खरेदी करून विद्यार्थिनींना उपलब्ध करून द्यायच्या आहेत. शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांच्या मार्गदर्शनात हे अनुदान शाळांना वितरित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)