अकोला जिल्ह्यातील ४१८ गावांत पाणीटंचाई निवारणाची ४०७ कामे पूर्ण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 02:41 PM2018-05-11T14:41:40+5:302018-05-11T14:41:40+5:30
अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात ५३४ गावांसाठी १ हजार ८४ उपाययोजनांची कामे प्रस्तावित असली तरी, एप्रिल अखेरपर्यंत जिल्ह्यातील ४१८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची ४०७ कामे पूर्ण करण्यात आली.
अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात ५३४ गावांसाठी १ हजार ८४ उपाययोजनांची कामे प्रस्तावित असली तरी, एप्रिल अखेरपर्यंत जिल्ह्यातील ४१८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची ४०७ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ६७७ कामे अद्याप प्रलंबित आहेत. पावसाळा तोंडावर आल्याच्या पृष्ठभूमीवर प्रलंबित पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तापत्या उन्हासोबतच अकोला जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले असून, टंचाईग्रस्त गावांमधील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विविध उपाययोजनांचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील ५३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १ हजार ८४ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, या उपाययोजनांच्या कामांसाठी २६ कोटी ८५ लाख ३८ हजार रुपयांचा अपेक्षित खर्च प्रस्तावित करण्यात आला. कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांसाठी संबंधित यंत्रणांच्या प्रस्तावानुसार एप्रिल अखेरपर्यंत ६०४ गावांसाठी ५४० उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाºयांमार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यापैकी ४१८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची ४०७ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ६७७ कामे अद्याप प्रलंबित आहेत. पावसाळा सुरू होण्यास वीस दिवसांचा कालावधी उरला असून, पाऊस सुरू झाल्यास पाणीटंचाई निवारणाची कामे करता येणार नाहीत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची प्रलंबित कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होणार की नाही आणि टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उपाययोजनांची केलेली अशी आहेत कामे !
जिल्ह्यातील ४१८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची ४०७ कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये विंधन विहिरी, कूपनलिका, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पुरक नळ योजना, टँकरद्वारे पाणी पुरवठा व खासगी विहिरींचे अधिग्रहण इत्यादी उपाययोजनांच्या कामांचा समावेश आहे.