४१६ क्षयरुग्णांचा पोषण आहार भत्ता होऊ शकतो बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:19 AM2021-09-19T04:19:55+5:302021-09-19T04:19:55+5:30
आहार भत्ता मिळावा, यासाठी प्रत्येक क्षयरुग्णाचे बँक खाते क्रमांक व इतर आवश्यक माहिती क्षयरुग्णांनी वेळेवर उपलब्ध करून देणे आवश्यक ...
आहार भत्ता मिळावा, यासाठी प्रत्येक क्षयरुग्णाचे बँक खाते क्रमांक व इतर आवश्यक माहिती क्षयरुग्णांनी वेळेवर उपलब्ध करून देणे आवश्यक असते, परंतु ही माहिती क्षयरुग्ण वेळेवर देत नाहीत किंवा दिली, तरी सदर बँक खाते अद्ययावत असेल असे नाही, ते बंदही असते. त्यामुळे पोषण आहार भत्ता शासनाकडून अडचणी येत असतात. सदर पोषण आहार भत्ता शासनाकडून जसे अनुदान उपलब्ध होते, तसे ऑनलाइन पद्धतीने क्षयरुग्णांच्या बँक खात्यावर अदा करण्यात येते. जानेवारी, २०२१ पासून आजपर्यंत अकोला शहरामध्ये मनपा दवाखाने व खासगी दवाखाने, यामध्ये उपचार घेणारे १,०४२ क्षयरुग्ण असून, त्यापैकी ६२६ क्षयरुग्णांचे बँक खाते अद्ययावत आहे. उर्वरित ४१६ रुग्णांचे खाते अद्ययावत नसल्यामुळे त्यांचा पोषण आहार भत्ता बंद होण्याची शक्यता आहे.
बँक खात्याची माहिती सादर न केलेल्या क्षयरुग्णांना पोषण आहार भत्त्याचा लाभ मिळणार नाही. त्यांचे बँक खाते अद्ययावत करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. बँक खात्याची माहिती उपलब्ध करून दिल्यास, पोषण आहार भत्ता सर्व क्षयरुग्णांना अदा करण्यात येईल व तांत्रिक करणास्तव खाते बंद असल्यास, त्या संदर्भात क्षयरुग्णांना मार्गदशन करण्यात येते. रुग्णांनी यासाठी कार्यालयाशी किंवा जिथे उपचार घेतात, तिथे संपर्क साधवा.
-डॉ.अस्मिता पाठक, क्षयरोग अधिकारी, मनपा, अकोला.