जागा नसल्याने ४,१९६ लाभार्थींना मिळेना घरकुल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:21 AM2021-03-01T04:21:13+5:302021-03-01T04:21:13+5:30
संतोष येलकर अकोला : पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास (ग्रामीण) योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाल्यानंतर स्वत:च्या मालकीची जागा नसल्याने, ...
संतोष येलकर
अकोला : पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास (ग्रामीण) योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाल्यानंतर स्वत:च्या मालकीची जागा नसल्याने, जिल्ह्यात ४ हजार १९६ लाभार्थींना घरकुलाचा लाभ अद्याप मिळाला नाही. त्यामुळे घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा नसलेल्या लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पंतप्रधान आवास योजना आणि रमाई आवास योजना (ग्रामीण ) अंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी प्रत्येकी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान शासनामार्फत देण्यात येते; परंतु गत दोन वर्षांच्या कालावधीत घरकुल योजनेंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थींपैकी घरकुल बांधकामासाठी स्वत:च्या मालकीची जागा उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यातील ४ हजार १९६ लाभार्थींना अद्याप घरकुलाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे घरकुल मंजूर झाल्यानंतर; परंतु स्वत:च्या मालकीची जागा नसलेल्या जिल्ह्यातील संबंधित लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जागेचा पुरावा सादर
करणे आवश्यक!
घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थींनी घरकुल बांधकामासाठी स्वत:च्या मालकीची जागा असल्याचा पुरावा संबंधित पंचायत समिती व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे सादर करणे आवश्यक आहे. जागा असल्याचा पुरावा सादर केल्यानंतरच संबंधित लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी अनुदान मंजूर करण्यात येते.
जागा नसल्याने घरकुल लाभापासून
वंचित असलेले असे आहेत लाभार्थी!
तालुका लाभार्थी
तेल्हारा १९००
अकोला ९७३
अकोट ४८०
बाळापूर १८
बार्शिटाकळी २६१
मूर्तिजापूर ४६०
पातूर १०४
................................................
एकूण ४१९६
घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थींपैकी घरकुल बांधकामासाठी स्वत:च्या मालकीची जागा नसल्याने जिल्ह्यात ४ हजार १९६ लाभार्थीं अद्याप घरकुल लाभापासून वंचित आहेत. घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध असल्याचा पुरावा सादर केल्यानंतर त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
सूरज गोहाड
प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा