मूर्तिजापूर तालुक्यात ४२ कुपोषित बालके आढळली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:48 PM2018-06-13T13:48:10+5:302018-06-13T13:50:22+5:30
मेळघाटप्रमाणेच मूर्तिजापूर तालुक्यातसुद्धा अनेक बालके कुपोषित आढळली असून, त्यांना सक्षम व सुदृढ बनवणारी यंत्रणाच आता कुपोषित असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे.
- संजय उमक
मूर्तिजापूर : ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक बालक सुदृढ व सक्षम व्हावा आणि त्याचे आरोग्य सुधारावे, यासाठी शासन अंगणवाडीच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात खर्च करते; पण मूर्तिजापूर तालुक्यातील परिस्थिती काही वेगळेच सांगून जाते. मेळघाटप्रमाणेच मूर्तिजापूर तालुक्यातसुद्धा अनेक बालके कुपोषित आढळली असून, त्यांना सक्षम व सुदृढ बनवणारी यंत्रणाच आता कुपोषित असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे.
राज्य व भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत मूर्तिजापूर येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाच्या मार्च २०१८ च्या कुपोषित बालकांच्या सर्वेक्षण अहवालानुसार तालुक्यात ८,२८३ साधारण, २५४ मध्यम तर ४२ बालकेतीव्र कुपोषित असल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तीव्र कुपोषित बालकांना वेळीच योग्य उपचार न मिळाल्यास त्यांची शारीरिक स्थिती अधिकाधिक गंभीर होऊन त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या बालकांच्या सेवनात पोषण आहाराचा अभाव व कुटुंबातील वातावरणामुळे कुपोषित होण्याची पाळी आली असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
ग्रामीण भागातील अंगणवाड्या डिजिटल करून बालकांची शारीरिक सुदृढता व शैक्षणिक उच्चांक वाढावा, यासाठी शासनाने पाऊल उचलले असले तरी तालुक्यातील दृश्य बघितले असता, डिजिटल अंगणवाडीत शिक्षण घेण्याचे स्वप्न ग्रामीण बालकांपासून कोसो दूर असल्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या तालुक्यातील १९० अंगणवाड्यांपैकी अनेक अंगणवाड्यांची अवस्था बिकट असून, सदर्हू अंगणवाड्यांत सेविका व मदतनीस नसल्याने बालकांच्या आरोग्याचा व शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्यातील हेंडज, बपोरी, राजणापूर खिनखिनी, सोनेरी, कानडी, जितापूर खेडकर येथे तर अंगणवाड्यांना सेविकाच नाहीत तर गोरेगाव येथील दोन, भटोरी येथील दोन , कानडी येथील तीन आणि माना, कुरुम, सोनाळा, सांगवी, अनभोरा, बपोरी, धानोरा वैद्य, सेलू वेताळ, राजूरा सरोदे, कावळा येथील प्रत्येकी एक अशा एकूण १६ अंगणवाड्यांमध्ये मदतनीसांच्या नियुक्त्याच नाहीत. बपोरी येथील अंगणवाडी सेविका व मदतनीसाविना ओस पडली आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेथे अंगणवाडी सेविका नाही अशा ठिकाणी तेथील मदतनीस बालकांना शिक्षणाचे धडे देत असल्याची बाब समोर आली आहे. केवळ मदतनीसाच्या भरवशावर अंगणवाडी चालत असल्याने बालकांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे.
कर्मचाऱ्यांची वानवा
शहराच्या अडगळीत असलेले एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाला अनेक समस्यांनी ग्रासले असून, हे कार्यालय सोईसुविधा व कर्मचाऱ्यांअभावी कुपोषित असल्याची लाजिरवाणी बाब समोर आली आहे. त्यामुळे कार्यालयाचा कारभारच कोलमडला आहे.
एकूण १० कर्मचाºयांची आवश्यकता असलेल्या कार्यालयाची सर्कस केवळ चार कर्मचाºयांच्या भरवशावर सुरू आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका -चार, क्लर्क, वाहन चालक अशी ७ पदे रिक्त असून, येथील विस्तार अधिकाºयांकडे क्लर्कचा अतिरिक्त पदभार आणि पर्यवेक्षिकेकडे प्रकल्प अधिकाºयांचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. दुहेरी पदभार सांभाळत असताना प्रचंड डोकेदुखी या कर्मचाºयांना सहन करावी लागत आहे. या कार्यालयाच्या वाहनाची अवस्था अत्यंत दयनीय असून, ते भंगारात जमा झाले आहे. सदर वाहन बंद व कर्मचाºयांचा अभाव असलेले एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयच कुपोषित झाले असल्याने कुपोषित बालकांमध्ये कशी सुदृढता निर्माण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तालुक्यातील १९० अंगणवाड्यांचा भार तीन महिला कर्मचाºयांच्या देखरेखीखाली चालत आहे. या कार्यालयाला एकूण १० कर्मचाºयांची आवश्यकता आहे; मात्र १० कर्मचाºयांचा भार केवळ ४ कर्मचारी सांभाळत आहेत. अतिरिक्त भार सांभाळताना कुचंबना होत आहे.
अनेक अंगणवाड्यांना सेविका व मदतनीस नसल्याने बालकांची योग्य ती काळजी घेतली जात नाही, रिक्त जागांसंदर्भात प्रत्येक महिन्याला वरिष्ठांना अहवाल कळविला जातो.
- चित्रलेखा कंझरकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी (प्रभारी)
पंचायत समिती, मूर्तिजापूर.