बाळापूर-पातूर तालुक्यातील ४३ ग्रामपंचायत सदस्य अपात्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:12 AM2020-09-29T11:12:12+5:302020-09-29T11:13:24+5:30
जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणे संबंधित ग्रामपंचायत सदस्यांना चांगलेच भोवले.
अकोला : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्ह्यातील बाळापूर व पातूर या दोन तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या ४३ सदस्यांना अपात्र ठरविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २४ सप्टेंबर रोजी दिला. अपात्र ठरलेल्या सदस्यांमध्ये एक सरपंचाचादेखील समावेश आहे. त्यामुळे जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणे संबंधित ग्रामपंचायत सदस्यांना चांगलेच भोवले.
ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीत संबंधित ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र संबंधित तहसीलदारांकडे सादर करणे बंधनकारक आहे. विहित कालावधीत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्याची तरतूद आहे. त्यानुसार २०१७ मध्ये जिल्ह्यात घेण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित जागांवर निवडून आल्यानंतर विहित कालावधीत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाºया सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाºयांना दिला होता. त्यानुसार बाळापूर व पातूर या दोन तालुक्यात जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाºया ग्रामपंचायत सदस्यांचा अहवाल बाळापूरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी गत आठवड्यात जिल्हाधिकाºयांकडे सादर केला होता. त्यानुषंगाने आरक्षित जागांवर निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाºया बाळापुर व पातूर तालुक्यातील ४३ ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला. अपात्र ठरविण्यात आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये पातूर तालुक्यातील एक सरपंचाचादेखील समावेश आहे.
तालुकानिहाय अपात्र ठरलेले असे आहेत सदस्य!
तालुका सदस्य
पातूर २४
बाळापूर १९
..................................
एकूण ४३
अकोला तालुक्यातील ४८ सदस्यांची सुनावणी!
ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षण जागांवर निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या अकोला तालुक्यातील ८५ ग्रामपंचायत सदस्यांची सुनावणी २८ सप्टेंबर रोजी अकोला उपविभागीय कार्यालयात ठेवण्यात आली होती. त्यापैकी उपस्थित ४८ ग्रामपंचायत सदस्यांची सुनावणी घेण्यात आली असून, गैरहजर राहिलेल्या ३७ सदस्यांची सुनावणी पुढील आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी सांगितले.