४३८ चालक, वाहकांचा दररोज चार हजारांपेक्षा जास्त प्रवाशांशी संपर्क!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 10:40 AM2021-02-25T10:40:05+5:302021-02-25T10:40:14+5:30
Akola News अकोल्यातील ४३८ चालक, वाहकांचा दररोज चार हजारांपेक्षा जास्त प्रवाशांसोबत संपर्क येतो.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून इतर फ्रंट लाईन वर्करसोबतच एसटी महामंडळाचे चालक, वाहकांनीही विशेष सेवा दिली आहे. शिवाय, लॉकडाऊननंतर एसटी सेवा सुरू झाल्यापासून अकोल्यातील ४३८ चालक, वाहकांचा दररोज चार हजारांपेक्षा जास्त प्रवाशांसोबत संपर्क येतो, मात्र त्यांना अजूनही कोविड लसीकरणाचा लाभ मिळाला नसल्याचे वास्तव आहे. कोरोना काळात वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबतच वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह आशा व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात टाकून कोरोना विरुद्ध लढा दिला. त्यांच्या या कार्याची दखल घेत कोविड लसीचा पहिला मान त्यांना देण्यात आला. त्यानुसार लसीकरणाला सुरुवातही झाली, परंतु इतर कर्मचाऱ्यांसोबतच एसटी महामंडळाच्या चालक, वाहकांनी देखील कोविड काळात प्रवाशांना परराज्यातून महाराष्ट्रात आणले. लॉकडाऊननंतर एसटी बस सेवा सुरू झाल्यापासून वाहक, चालकांचा दररोज चार हजारांपेक्षा जास्त प्रवाशांशी संपर्क येत आहे. असे असले तरी कोविड लसीकरणात लाभार्थी म्हणून त्यांचा अजूनही समावेश करण्यात आला नाही. एसटीचे चालक, वाहक हे हायरिस्क व्यक्ती असून, त्यांच्यापासून अनेकांना व इतरांपासून त्यांना कोरोनाची भीती आहे. अशा परिस्थितीत कोविड लसीकरणासाठी त्याचाही प्राधान्याने विचार होणे गरजेचे आहे.
वाहक - २१४
चालक - २२४
बस फेऱ्या - ८०
४००० प्रवाशांचा रोज प्रवास
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण बसस्थानकावरून दररोज हजारो प्रवाशांचा एसटीने प्रवास होतो. या शिवाय जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या व जिल्हाबाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे दिवसाला सरासरी ४००० प्रवासी एसटीचा प्रवास करत असल्याचा अंदाज एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
तपासणीच नाही
एसटी वाहक, चालकांचा दररोज हजारो प्रवाशांसोबत संपर्क होतो. त्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीतही एसटीच्या चालक, वाहकांची नियमित वैद्यकीय तपासणी होत नसल्याचे वास्तव आहे. एसटीचे चालक, वाहक हे दोन्ही घटक हायरिस्कमधील असल्याने त्यांची नियमित तपासणी होणे गरजेचे आहे.
लसीकरण कधी
एसटी वाहक, चालकांची नावे अजूनही लसीकरण लाभार्थींच्या यादीत समाविष्ट करण्यात आली नाहीत. यासाठी एसटी महामंडळातर्फे जिल्हास्तरावर आवश्यक प्रयत्न केले जात आहेत.
गत आठवड्यात एसटीच्या विभागीय कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना कोविड लसीकरणामध्ये एसटी चालक, वाहकांचा समावेश करुन घ्यावा, अशा मागणीचे निवेदन देण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळातर्फे देण्यात आली.
मास्क, सॅनिटायझरवर होणारा खर्च
एसटी वाहक चालकांना एसटी महामंडळातर्फे सुरुवातीला मास्क आणि सॅनिटायझर वितरित करण्यात आले होते, मात्र त्यानंतर एसटी वाहक, चालक मास्क व सॅनिटायझर स्वखर्चाने खरेदी करीत असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.
त्यामुळे मास्क, सॅनिटायझरवर एसटी महामंडळाचा प्रत्यक्षात खर्च होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एसटी महामंडळातर्फे चालक, वाहकांना प्राधान्याने मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे, परंतु, तसे होताना दिसून येत नाही.
एसटी चालक, वाहकांना कोरोनाची लस मिळावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांची भेट घेतली. यासंदर्भात त्याना निवेदनही दिले, परंतु अजूनतरी त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
- अरविंद पिसोळे, आगारप्रमुख, मध्यवर्ती बसस्थानक, अकोला
दररोज शेकडो प्रवाशांच्या संपर्कात येतो. ही प्रत्यक्ष सेवा आहे, त्यामुळे सुरक्षा प्रश्न उपस्थित होत आहे. मला स्वत:ला कोरोना होऊन गेला आहे. अशा परिस्थितीत इतर घटकांप्रमाणे आम्हालाही कोविड लस देण्यात यावी. मास्क आणि सॅनिटायझर आम्ही स्वत:च खरेदी करतो. स्वत:ची काळजी स्वत:च घेतो.
दीपक पवार, चालक, एसटी महामंडळ
एसटी वाहक, चालकांचा दररोज अनेक प्रवाशांशी संपर्क येतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी आमच्या सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने इतर घटकांप्रमाणे आम्हालाही कोविड लस द्यावी.
- चंद्रशेखर चराटे, वाहक, एसटी महामंडळ