प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची ४४ कोटींची पाणीपट्टी थकीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 10:23 AM2020-09-26T10:23:43+5:302020-09-26T10:23:52+5:30
आॅगस्ट अखेरपर्यंत ४४ कोटी १९ लाख ९६ हजार १५९ रुपये पाणीपट्टीची रक्कम थकीत आहे.
अकोला : जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील सहा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची आॅगस्ट अखेरपर्यंत ४४ कोटी १९ लाख ९६ हजार १५९ रुपये पाणीपट्टी थकीत आहे. त्यामुळे पाणीपट्टी वसुलीच्या कामात संबंधित ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर येत आहे.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर व तेल्हारा या चार तालुक्यांतील गावांसाठी सहा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यामध्ये अकोला तालुक्यातील खांबोरा ६० गावे व ४ गावे, अकोट व तेल्हारा तालुक्यातील ८४ खेडी आणि बाळापूर तालुक्यातील कारंजा-रमजानपूर, लोहारा व वझेगाव इत्यादी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांमध्ये पाणी पुरवठ्यापोटी पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींची आहे; परंतु अकोला, अकोट, बाळापूर व तेल्हारा या तालुक्यांतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची आॅगस्ट अखेरपर्यंत ४४ कोटी १९ लाख ९६ हजार १५९ रुपये पाणीपट्टीची रक्कम थकीत आहे. त्यामुळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत पाणीपट्टी वसुलीच्या कामाकडे संबंधित ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव सामोर येत आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत सहा ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत थकीत पाणीपट्टीची रक्कम वसूल करण्यासंदर्भात संबंधित ग्रामपंचायतींना निर्देश देण्यात आले आहेत.
- किशोर ढवळे
कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद.